निकालाला होणाऱ्या विलंबामुळे अभाविपचा कुलगुरूंना इशारा

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख एकीकडे मोठय़ा मोठय़ा बाता मारत असताना विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे निकालही वेळेवर लावता येत नाहीत, तसेच गुणपत्रिकाही अनेक दिवस विद्यार्थ्यांना मिळत नसून विद्यापीठाकडून याबाबत उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असून दोन दिवसांत निकाल लावले नाहीत तर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा अभाविपने कुलगुरूंना दिला आहे. विद्यापीठाच्या एकूणच भोंगळ कारभाराविरोधात अभाविपने आता रणशिंग फुंकले असून कुलगुरूंनी आता ‘हवेत पतंग’ उडवणे बंद करावे, असा टोलाही अभाविपने लगावला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार ४५ दिवसांमध्ये निकाल लावणे बंधनकारक आहे. विद्यापीठाच्या अखत्यारीत सुमारे ७४० महाविद्यालये येत असून या महाविद्यालयांतून ५५० विषय शिकविण्यात येतात.

एकूण एक हजाराहून अधिक परीक्षा घेणाऱ्या विद्यापीठाला या परीक्षांचे निकालही साधे वेळेवर लावता येत नसताना कुलगुरू मात्र नव्या योजनांचे ‘हवेत इमले’ बांधत फिरत आहेत. या साऱ्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून त्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाची जाणही विद्यापीठ बाळगताना दिसत नाही, असे अभाविपचे मुंबई महानगरमंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी सांगितले. वाणिज्य शाखेचा निकाल २४ जून रोजी लागूनही अद्यापि विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका देण्यात आलेल्या नाहीत. परिणामी, पुढील शैक्षणिक वर्षांलाही आता उशीर होणार आहे.

त्यामुळे या विलंबाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षांच्या अभ्यासक्रमावरही होणार आहे. तसेच, प्रवेशप्रक्रियेलाही यामुळे विलंब होणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

उडवाउडवीची उत्तरे

प्रमुख शाखांचे निकाल लागले असले तरी अनेक छोटय़ा अथवा पदव्युत्तर शाखांचे निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थी संभ्रमित आहेत. अभाविपने याबाबत परीक्षा विभागाशी संपर्क साधल्यानंतर नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली असून ही गोष्ट यापुढे सहन केली जाणार नाही, असे अनिकेत ओव्हाळ यांनी सांगितले. निकाल उशिरा लावायचा आणि गुणपत्रिकाही वेळेवर द्यायची नाही, या विद्यापीठाच्या अजब कारभाराचा मनस्ताप विद्यार्थ्यांना विनाकारण सहन करावा लागत आहे. कुलगुरू याबाबत गंभीर नसून दोन दिवसांत उर्वरित परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले नाहीत तर अभाविप परीक्षा विभागाला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अभाविपने दिला आहे.