वारंवार राज्य स्तरावर लॉकडाउन आणि अनलॉक करावा लागू नये, यासाठी ठाकरे सरकारने पंचस्तरीय सूत्र तयार केलं आहे. निर्बंध वाढवण्याचा वा शिथिल करण्याचा निर्णय घेण्यासाठी करोना परिस्थितीनुरूप पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी नियमावली तयार केली असून, काही निकषही ठरवण्यात आले आहेत. या निकषानुसार मुंबईकरांना पुढील आठवड्यात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पाच स्तरापैकी पहिल्या पहिल्या स्तरात येणाऱ्या जिल्ह्यातील वा महानगरपालिकाला क्षेत्रातील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्याची सूट दिलेली आहे. त्याचबरोबर लोकल सेवा सुरू करण्यासही परवानगी दिलेली आहे. त्यामुळे मुंबईत लोकलसेवेबद्दल काय निर्णय होणार हे एकदोन दिवसात स्पष्ट होणार आहे.

राज्य सरकारने उपलब्ध ऑक्सिजन बेड आणि पॉझिटिव्ही रेट असे काही निकष ठेवलेले आहेत. पॉझिटिव्ही रेट जास्त असेल, अशा जिल्ह्यांतील वा शहरातील निर्बंध कायम ठेवण्याची सूचना यात करण्यात आलेली आहे. तर पॉझिटिव्ही रेट ५ टक्क्यांच्या आत असणाऱ्या जिल्ह्यात काही ठिकाणीच निर्बंध ठेवण्याची सूचना आहे. प्रत्येक आठवड्यातील पॉझिटिव्ही रेट आणि उपलब्ध बेडच्या संख्येनुसार स्थानिक प्रशासन हा निर्णय घेणार आहे.

Maharashtra Unlock: लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल, प्रायव्हेट ऑफिसेस… कुठे काय सुरु काय बंद जाणून घ्या

या आठवड्यातील सर्व जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटची यादी राज्य सरकारने जाहीर केली असून, त्यात मुंबई आणि मुबई उपनगरांचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत म्हणजेच ४.४० टक्के इतका कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध आणखी कमी होण्याबरोबरच सर्वसामान्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्याबद्दलचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारने महापालिकेला दिलेला असल्याने मुंबई महापालिका काय निर्णय घेणार, याकडे सगळ्याचंच लक्ष असणार आहे.

‘अनलॉक’चा गोंधळ संपला!; निर्बंध हटवण्यासाठी असे आहेत पाच टप्पे

पहिल्या गटात कोणते निर्बंध शिथिल केले जातात…?

पहिल्या गटात मोडणाऱ्या जिल्हे आणि शहरातील सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू करण्यास परवानगी आहे. त्याचबरोबर मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहेसुद्धा नियमितपणे सुरू करण्यास परवानगी असणार आहे. रेस्तराँ सुरू करण्यासाठीही परवानगी. लोकल सेवा पूर्ववत होईल मात्र, स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा देण्यात आलेली आहे. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेनं सुरू राहतील. विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल. लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी असणार आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल करण्यात आली आहे. या भागात जमावबंदीही नसणार आहे.