X
X

पालिकेची उद्याने रात्री नऊपर्यंत खुली

READ IN APP

सर्व उद्याने आता सकाळी सहा ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत सुरू राहतील.

मुंबईतील महापालिकेअंतर्गत येणारी सर्व उद्याने आता रात्री नऊ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. शहरातील उद्याने संध्याकाळी सात ते आठ या वेळेत बंद होत असल्याने नागरिक आणि मुलांची गैरसोय होते. याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार इथून पुढे बारा तास उद्याने खुली ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

शहरामधील अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, गर्दीची ठिकाणे या साऱ्या गोंगाटातून निवांतपणा अनुभवण्यासाठी नागरिकांना उद्याने हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे. मोकळ्या मैदानांचा अभाव असल्याने मुलांनाही खेळण्यासाठी उद्यानांचीच जागा सध्या उपलब्ध आहे. परंतु शहरातील उद्याने संध्याकाळी सात ते आठ या वेळेत बंद होत असल्याने संध्याकाळी कामावरून येणारे नागरिक किंवा शाळेतून येणाऱ्या मुलांना या उद्यानांमध्ये जाण्याची संधीच मिळत नव्हती. याबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पालिकेच्या उद्यानांची वेळ रात्री नऊपर्यंत वाढविण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.

मुंबईमध्ये पालिकेची ७५० उद्याने आहेत. ही सर्व उद्याने आता सकाळी सहा ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत सुरू राहतील. दिवसभरात १२ तास उद्याने खुली ठेवण्यात येतील. याच बरोबरीने सर्व उद्यानांची दुपारी १२ ते ३ या वेळेत दररोज पाहणी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. सर्व उद्यानांच्या बाहेर सुधारित वेळेचे फलकही लावण्यात येतील, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

22
X