19 December 2018

News Flash

वैश्विक मानवी इतिहास उलगडणारे प्रदर्शन महाराष्ट्रभर

बसची संपूर्ण रचना एखाद्या छोटय़ा वस्तुसंग्रहालयासारखी असून ती संपूर्ण वातानुकूलित आहे.

‘म्युझियम ऑफ व्हील्स’ बसची संपूर्ण रचना एखाद्या छोटय़ा वस्तुसंग्रहालयासारखी असून ती संपूर्ण वातानुकूलित आहे.

बसमधील फिरत्या संग्रहालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातही ‘इतिहास’ पोहोचणार

वैश्विक मानवी इतिहासाचे दाखले देणाऱ्या वस्तूंनी सजलेले भारतातील आजवरचे सर्वात मोठे वस्तुप्रदर्शन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात प्रदर्शित झालेले आहे. मात्र, हे प्रदर्शन प्रत्यक्ष येऊन पाहणे शक्य नसणाऱ्यांसाठी इतिहासाचा हा ठेवा लघुरूपात महाराष्ट्रभर पोहोचवण्याचा विचार आता सुरू झाला आहे. यासाठी ‘म्युझियम ऑफ व्हील्स’ ही बस सज्ज करण्यात आली असून ही बस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन वैश्विक मानवी इतिहास तेथील जनतेपर्यंत पोहोचवणार आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या ‘म्युझियम ऑफ व्हील्स’ बसने आजवर १४,१४८ किलोमीटरचा प्रवास केला असून सध्या फिरते संग्रहालय नवीन प्रदर्शनाच्या प्रवासाकरिता सज्ज झाले आहे. ज्या लोकांना वस्तुसंग्रहालयातील प्रदर्शन प्रत्यक्षरीत्या पाहणे शक्य नाही, अशा लोकांना फिरत्या संग्रहालयामुळे प्रदर्शनाची लघुकृती पाहता येणार आहे. संग्रहालयात रविवारपासून सुरू झालेले ‘देश-परदेश, नऊ अध्याय एक इतिहास’ या सर्वात मोठय़ा प्रदर्शनाचे लघुरूप या बसमधून राज्यातील विविध शहरांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती वस्तुसंग्रहालयाच्या शिक्षण अधिकारी बिल्वा कुलकर्णी यांनी दिली.

‘म्युझियम ऑफ व्हील्स’ बसची संपूर्ण रचना एखाद्या छोटय़ा वस्तुसंग्रहालयासारखी असून ती संपूर्ण वातानुकूलित आहे. शिवाय काचेच्या पेटय़ा, माहिती संच, दृक्श्राव्य साधने आणि टच स्क्रीन डिजिटल टॅबलेट्ससारखी उपकरणे यामध्ये आहेत. नव्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ज्या ठिकाणी बसचे वास्तव्य असेल तिथे विविध कार्यशाळा आणि उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ब्राह्मी, क्यूनिफॉर्मस, चित्रलिपी या प्राचीन लिपींची ओळख, चला एस्ट्रोलेब (खलाशी यंत्र) बनवू या आणि आपले संविधान बनवा या कार्यशाळांचे आणि मातीकाम प्रात्यक्षिक, नाण्यांचे निर्माण, मुद्रणकला, बोधचिन्ह बनवा असे उपक्रम फिरत्या संग्रहालयाच्या माध्यमातून लहानग्यांसाठी राबवले जाणार आहेत. शालेय मुलांमध्ये पुरातन वस्तू आणि प्राचीन इतिहासाबाबत आवड निर्माण व्हावी आणि तरुणांमध्ये याबद्दल जिज्ञासा निर्माण करणाचा उद्देश असल्याने फिरत्या संग्रहालयाच्या भेटीचे पहिले प्राधान्य शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांना असल्याची माहिती ‘म्युझियम ऑफ व्हील्स’चे शिक्षण अधिकारी अजय साळुंखे यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठे प्रदर्शन मुंबईत प्रथमच होत असल्याने फिरत्या संग्रहालयाच्या माध्यमातून या प्रदर्शनाची प्रतिकृती आधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून मुंबईपर्यंत येणे शक्य नसलेल्या लोकांना याची माहिती आणि अनुभव घेता येईल.

–  कृतिका चौधरी, साहाय्यक शिक्षण अधिकारी, वस्तुसंग्रहालय

First Published on November 14, 2017 2:52 am

Web Title: museum on wheels in maharashtra brings history closer to people