News Flash

खय्याम यांचे देहावसान

भावोत्कट आणि प्रयोगशील संगीतकाराचा अस्त

(संग्रहित छायाचित्र)

हिंदी चित्रपट संगीतात आपल्या भावोत्कट शैलीचा ठसा उमटविणारे प्रयोगशील संगीतकार खय्याम यांचे दीर्घ आजाराने सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. ‘उमराव जान’, ‘बाजार’, ‘नूरी’, ‘कभी कभी’ आदी चित्रपटांतील त्यांची गीते आजही रसिकप्रिय आहेत.

फुफ्फुसाच्या संसर्गामुळे खय्याम यांना सुजय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र वार्धक्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली आणि सोमवारी रात्री उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

मोहम्मद जहूर ‘खय्याम’ हाश्मी असे खय्याम यांचे पूर्ण नाव. बालपणापासूनच संगीत साधना करणाऱ्या खय्याम यांनी वयाच्या १७व्या वर्षी पंजाबमधील लुधियाना शहरातून संगीत क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धानंतर ते मुंबईत आले. १९४८ साली त्यांनी ‘हीर-रांझा’ या चित्रपटाला पहिल्यांदा संगीतकार रहमान वर्मा यांच्यासोबत संगीत दिले. मात्र फाळणीनंतर रहमान पाकिस्तानात परतले आणि खय्याम यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून सुरुवात केली. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती १९५८ साली प्रदर्शित झालेल्या राज कपूर यांच्या ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटाने.

अतिशय मनस्वी संगीतकार म्हणून खय्याम प्रसिद्ध होते. ५०च्या दशकातील गीतकार-संगीतकार हे त्यांच्या कलेबाबत ठाम होते. एकेका गाण्यावर त्यांच्या बैठका होत असत. त्या काळाचेच प्रतिनिधित्त्व करणारे संगीतकार खय्याम यांनी आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही.

अतिशय अभ्यासू कुटुंबातील खय्याम यांना लहानपणापासूनच चित्रपटांचे वेड होते. चित्रपटात अभिनेता बनण्याच्या इच्छेने ते अनेकदा घर सोडून दिल्लीत पळून येत असत. दिल्लीमध्ये त्यांच्या काकांनी अखेर त्यांना संगीताचे शिक्षण घेण्याची परवानगी दिली. त्या वेळी पंडित अमरनाथ यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. त्याचबरोबर लाहोर येथील प्रसिद्ध संगीतकार बाबा चिश्ती यांच्याकडूनही त्यांनी संगीतचे धडे गिरवले. चिश्ती यांनीच त्यांच्यातील गुणवत्ता हेरून त्यांना संगीत सहाय्यक म्हणून काम करण्यास विचारणा केली.

त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत उत्तम गीतकारांसोबत काम केले. त्यात साहिर लुधियानवी, कैफी आजमी, मजरूह सुल्तानपुरी, निदा फाज़्‍ालीजावेद अख्तर यांच्यासोबत त्यांनी काम केले.

१९८२ मध्ये ‘उमराव जान’च्या संगीताबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २००७मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. २०११मध्ये ‘पद्म्भूषण’ किताबाने त्यांना गौरविले गेले होते.

रसिकप्रिय सुरावटी..

परबतों के पेडों पर, तुम अपना रंज ओ गम (शगुन), कभी कभी मेरे दिल मे, मै पल दो पल का शायर हूँ, तेरे चेहरे से नजर नहीं हटती, मेरे घर आयी एक नन्ही परी (कभी कभी), मुहब्बत बडे काम की बात है, जानेमन तुम कमाल करते हो, आप की महकी हुई जुल्फों को (त्रिशूल), ये मुलाकात एक बहाना है, माना तेरी नज़र में (खानदान), आँखों मे हमने आपके सपने सजाए है, हजार राहें मुडम् के देखी (थोडी सी बेवफाई), सिमटी हुई ये घडियाँ (चम्बल की कसम), तुम्हारे पलकों की चिलमनों में (नाखुम्दा), ना जाने क्या हुआ, प्यार का दर्द है (दर्द), कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता (आहिस्ता आहिस्ता),  चांदनी रात में (दिल ए नादान), देख लो आज हम को, दिखाई दिये यूँ, करोगे याद तो हर बात, फिर छिडी रात (बाज़ार), ख्वाब बन के, जलता है बदन, ऐ जंजीर की झंकार, हरियाली बन्ना आया रे (रझिया सुल्तान), गरजे घटा (यात्रा),इन आँखों की मस्ती के, जब भी मिलती है, जुस्तजू जिस की थी, ये क्या जगह है दोस्तों, झिंदगी जब भी (उमराव जान).

काही गाजलेली गाणी..

शाम ए गम की कसम (फूटपाथ), वो सुबह कभी तो आएगी (फिर सुबह होगी), बहारों मेरा जीवन भी सँवारो (आखरी खत), कभी कभी मेरे दिल मे (कभी कभी), आप यूँ फासलों से गुजरते रहें (शंकर हुसेन), आजा रे ओ मेरे दिलबर (नूरी), फिर छिडी रात (बाज़ार), ऐ दिले नादान (रझिया सुल्तान),  दिल चीज क्या है, इन आँखों की मस्ती के (उमराव जान)

कळसाध्याय..

आपल्या मतांशी, विचारांशी सहमत असलेल्या दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले. त्यामुळे बऱ्याचवेळा ते मोठय़ा व्यावसायिक चित्रपटांपासून दूर राहिले. ८०च्या दशकात दिग्दर्शक यश चोप्रा यांनी खय्याम यांच्यासोबत जे चित्रपट केले त्यातून संगीतकार म्हणून त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले. ‘उमराव जान’, ‘नूरी’, ‘कभी-कभी’, रझिया सुल्तान’, ‘त्रिशूल’, ‘बाजार’, इत्यादी चित्रपटांतील त्यांची अवीट गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. या चित्रपटांमधील अविस्मरणीय संगीताने खय्याम यांना नव्या उंचीवर नेऊन ठेवले. हे चित्रपट खय्याम यांच्या संगीताने अजरामर झाले.

अनेक अविस्मरणीय गीते देणारे विख्यात संगीतकार खय्याम यांचा हा देश नेहमीच ऋणी राहील. उदयोन्मुख गायकांना त्यांनी जे प्रोत्साहन दिले त्याबद्दलही त्यांचे स्मरण नेहमीच राहील. त्यांचे निधन क्लेशकारक आहे.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 2:50 am

Web Title: music composer khayyam passes away abn 97
Next Stories
1 मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवात सुकर
2 ‘प्रसारमाध्यमांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्य; परंतु प्रकरण संवेदनशील’
3 बीडीडी चाळीतील रहिवाशांना ‘एसीबी’ची नोटीस
Just Now!
X