मुंबई : नाना पाटेकर आणि मुक्ता बर्वे यांच्यातील साम्य काय? रंगभूमी आणि चित्रपट या माध्यमांतील हे दोघेही अव्वल कलावंत. म्हणजे अभिनय या दोघांना बांधणारा समान धागा. तो सर्वश्रुतच. पण त्याबरोबरच या दोघांना बांधणारे आणखी एक समान सूत्र आहे.

ते आपल्या डोळ्यांसमोर उलगडताना अनुभवायची संधी आहे २८ फेब्रुवारीस सायंकाळी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृही आयोजित ‘लोकसत्ता अभिजात’ या उपक्रमाच्या पहिल्या सत्रात.

‘लोकसत्ता’ आयोजित ‘अभिजात’च्या रंगमंचावर हे दोघे प्रेक्षकांना सामोरे येतील तेव्हा त्यांची संहिता त्यांनीच लिहिलेली असेल. कोणा लेखकाने लिहिलेले संवाद ते सादर करणार नाहीत आणि मुख्य म्हणजे ती संहिता गद्य असणार नाही. अनेकांना अविश्वसनीय वाटेल, पण आपल्या उत्कट अभिनयासाठी ओळखले जाणारे हे दोघे तितकेच उत्कट कवीही आहेत. या दोघांतील ‘अभिजात’ कवीपण अनुभवावे असेच.

अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, किशोर कदम ‘सौमित्र’ आणि सोनाली कुलकर्णी हे तिघेही याच जातकुळीतले. सोनालीदेखील ‘सो-कूल’ कवयित्री आहेत. हे तिघेही ‘अभिजात’चे मानकरी. यांना साथ द्यायला असतील असेच जातिवंत कवी अशोक नायगावकर, कवयित्री नीरजा आणि मिलिंद जोशी. ही काव्यवंतांची यादी येथेच संपत नाही.

शब्दांच्या आकाशात

शब्दांचे मेघ फिरावे

शब्दांच्या क्षितिजावरती

शब्दांनी बिंब धरावे..

असे सुधीर मोघे लिहून गेलेत. कल्पनेच्या क्षितिजावर या कलाकारांच्या भावविभोर शब्दमेघांचे बरसणे हादेखील एक ‘अभिजात’ अनुभव. चुकवू नये असा!!

प्रायोजक

या कार्यक्रमाचे प्रायोजक ‘वर्ल्ड वेब सोल्यूशन्स’ असून, तन्वी हर्बल्स, एमआयडीसी आणि मँगो हॉलिडेज हे सहप्रायोजक आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्रह्मविद्या साधक संघ पॉवर्ड बाय असलेल्या या कार्यक्रमाचे बँकिंग पार्टनर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड़, नॉलेज पार्टनर नेटभेट ईलर्निग सोल्यूशन्स आणि टेलिव्हिजन पार्टनर एबीपी माझा हे आहेत.