19 January 2021

News Flash

‘इंग्रजीवर प्रभुत्व नसल्याचा न्यूनगंड नको’

हुकूमत असलेल्या भाषेतून परीक्षा, मुलाखत देण्याचा नांगरे-पाटील यांचा सल्ला

संग्रहित छायाचित्र

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा प्रभुत्व असलेल्या भाषा माध्यमातून द्यावी. इंग्रजीवर प्रभुत्व नसल्याचा न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. मात्र, आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी इंग्रजीही आले पाहिजे, असा सल्ला नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी ‘लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरू’ या उपक्रमात बुधवारी परीक्षार्थ्यांना दिला. ‘निरीक्षण क्षमता, जिद्द, कष्ट करण्याची तयारी,’ अशी यशाची त्रिसूत्रीही त्यांनी सांगितली.

अधिकारी होण्याचा निर्णय घेण्यापासून ते परीक्षेची तयारी, परीक्षा देणे, अधिकारी म्हणून काम करताना आवश्यक असणारी कौशल्ये अशा विविध मुद्दय़ांवर नांगरे-पाटील यांनी उमेदवारांशी संवाद साधला. ‘लोकसत्ता’चे स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ आणि स्वाती पंडित यांनी त्यांना बोलते केले.

नांगरे-पाटील म्हणाले, ‘मी मराठी माध्यमातून शिकलो. अगदी यूपीएससीची मुलाखतही मराठीतूनच दिली. मुलाखतीमध्ये ज्ञानापेक्षा तुमचा दृष्टिकोन पडताळण्यावर भर असतो. तुम्हाला असलेली माहिती, विश्लेषण कौशल्यांची पडताळणी लेखी परीक्षेतून झालेली असते आणि त्यानंतर तुम्ही मुलाखत देत असता. त्यामुळे ज्या भाषेत संवाद साधण्याचा आत्मविश्वास असेल, ज्या भाषेवर प्रभुत्व असेल त्या भाषेतून मुलाखत द्यावी. लेखी

परीक्षेसाठीही भाषेचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. प्रश्नातील खाचाखोचा, बारकावे कळण्यासाठी भाषा चांगली हवी. त्यासाठी वाचन हवे. मात्र, त्याचवेळी स्थानिक भाषेतून परीक्षा देतानाही इंग्रजीचेही ज्ञान असणे आवश्यक असते.’

परीक्षेची तयारी अगदी अकरावी, बारावीपासून सुरू करावी, असे सांगून ते म्हणाले, ‘सामान्यज्ञान चांगले असणे हा परीक्षेच्या तयारीचा पाया आहे. त्याची तयारी लवकरात लवकर सुरू करावी. त्यासाठी वाचन आणि निरीक्षणशक्ती हवी. त्यानंतर हाती असलेली माहिती, निरीक्षणे यांचे सुसूत्रीकरण, परिस्थितीचे विश्लेषण करणे या सवयी अंगी बाणवणे आवश्यक आहे. तुमचे विचारही समतोल हवेत. जिद्द, कष्ट, सातत्य असेल तर यश मिळवणे कठीण नाही. निराश न होता नकारात्मक परिस्थितीचाही सकारात्मक उपयोग करून प्रयत्न करत राहिले पाहिजे. मात्र, त्याचवेळी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेताना हाती दुसऱ्या क्षेत्राचा पर्यायही असावा.’

अधिकारी म्हणून काम करताना..

‘आपल्या संघाचे नेतृत्व करताना उत्तम संवाद कौशल्य हवे. पोलीस दलात तातडीने प्रतिसाद देणे, निर्णय घेणे आवश्यक असते. प्रत्येक दिवस आव्हानात्मक असतो. अशावेळी सहकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक असते. अधिकारी सर्वसमावेशक असेल तर त्याला सगळे साहाय्य करतात. संवेदशीलतेने प्रश्नांकडे पाहिले पाहिजे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करता येणे, अद्ययावत असणे गरजेचे असते, असे विश्वास नांगरे-पाटील म्हणाले.

भीती नको, साहस हवे!

भीती वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, ती साहसात रूपांतरित करता यायला हवी. पोलीस खात्यात काम करताना समर्पणाची भावनाही महत्त्वाची असते. प्रसंग पाहून सामोरे जायचे असते, असे नमूद करून २६/११च्या हल्ल्यातील घटना, चाकण येथील दंगल, नाशिक येथील दरोडय़ाचा उलगडा अशा आठवणी नांगरे-पाटील यांनी सांगितल्या. ‘ताजमध्ये हल्ला झाला त्यावेळी ११ मिनिटांत मी तेथे पोहोचलो. माझ्याकडे हत्यार नव्हते, बुलेटप्रूफ जॅकेट नव्हते. परंतु ताजची रचना मला व्यवस्थित माहिती होती. त्यावेळी तातडीने हल्ल्याचा प्रतिकार करणे आवश्यक होते. त्यामुळे मी तेथे गेलो. दहशतवाद्यांच्या एके ४७ ला फक्त पिस्तुलाच्या बळावर तोंड देता येणार नाही. पण, घेतलेली शपथ आठवली आणि ताजमध्ये शिरलो, अशी आठवण नांगरे-पाटील यांनी सांगितली. नाशिक येथील ‘मुथूट’वरील दरोडाही गंभीर होता. कंपनीतील १६ कोटी रुपये किमतीचे सोने चोरण्याची योजना होती. कंपनीतील सॅजी सॅम्युअल याने हा दरोडा रोखण्यासाठी बलिदान दिले. कटातील मुख्य सूत्रधाराने बिहारमध्ये तुरुंगात बसून दीड वर्ष या कटाचे नियोजन केले होते. तपास लागू नये यासाठी अनेक गोष्टींचा अवलंब त्याने केला होता. मात्र आमच्या सहकाऱ्यांनी कष्ट घेतले. बिहारमध्ये जाऊन तपास करून सर्व प्रकाराचा छडा लावला. नाशिक शहरातील खून ४० टक्क्य़ांनी घटले आहेत, ३०० गुन्हेगारांना तडीपार केले आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी उपक्रम आम्ही राबवतो, असे त्यांनी सांगितले.

करोनाला तोंड देताना..

‘करोनाला तोंड देण्याची मानसिक तयारी पूर्वीपासून सुरू होती. भयगंडाला बळी न पडता या परिस्थितीला समर्थपणे कसे सामोरे जाता येईल याचा विचार करण्यात आला. पोलीस दलाचे काम हे कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सकस आहार, पुरेशी विश्रांती, चांगला व्यायाम यावर अवलंबून असते. त्यामुळे नाशिकमध्ये टाळेबंदी लागू झाल्यावर मी कर्मचाऱ्यांसाठी कामाचा कालावधी आठ तास केला. पोलिसांना ग्रीन टी, पाण्याच्या बाटल्या, च्यवनप्राश, अर्सेनिक अल्बम ३० गोळ्या दिल्या. पोलिसांची रोगप्रतिकारशक्ती टिकून राहण्यासाठी याचा उपयोग झाला. पाचशे स्मार्ट वॉचेस आम्ही घेतली. नागरिक, अनेक संस्थांनी यासाठी मदत केली. अक्षय कुमारने जवळपास दीडशे घडय़ाळे दिली. त्यामुळे कोविड डॅशबोर्डवर कर्मचाऱ्यांच्या नोंदी ठेवणे शक्य झाले. सातत्याने तापमानाची नोंद, रक्तदाब, छातीचे ठोके अशा नोंदी होतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना तातडीने मदत पोहोचवणे शक्य झाले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांशी नियमित संवाद साधून त्यांचा आत्मविश्वास टिकावा यासाठी प्रयत्न केले. नियम मोडून बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली. सध्या घरात बसणे कंटाळवाणे वाटत असले तरी त्याला पर्याय नाही. या परिस्थितीकडेही संधी म्हणून पाहून हा काळ कौटुंबिक नाती अधिक सक्षम करण्यासाठी, स्वत:चा कौशल्य विकास करण्यासाठी वापरणे शक्य आहे, असे विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.

शारीरिक आणि मानसिक आरोग्य महत्वाचे

‘नियमित व्यायाम करणे आवश्यक असते. त्याचबरोबर मानसिक आरोग्यासाठी कौटुंबिक वातावरण महत्वाचे असते. काम, स्वत:ला आणि कुटुंबाला वेळ देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. आपल्या वेळेतील एक-तृतीयांश वेळ हा कामालाच दिला पाहिजे. एकतृतीयांश स्वत:ला, आपल्या छंदाला, मित्र-परिवारासाठी आणि एकतृतीयांश वेळ हा कुटुंबासाठी राखून ठेवा, असा सल्ला नांगरे-पाटील यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 12:38 am

Web Title: nangre patils advice to give exams and interviews in the language you are fluent in abn 97
Next Stories
1 ऑनलाइन वर्गाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणारे देशहितविरोधी!
2 सीबीएसई अभ्यासक्रमातून ‘लोकशाही’ची वजाबाकी
3 ‘नवीन गुंतवणूकदारांना नोकरभरतीसाठी ‘महाजॉब्स’ बंधनकारक’
Just Now!
X