उद्योजक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सवाल

नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या विरोधकांचे ‘बोलविते धनी’ कोण, हाच प्रश्न सध्या उद्योग आणि सरकारी वर्तुळात चर्चिला जात असून, या प्रकल्पास विरोध करणाऱ्यांना नक्की कोणाचे पाठबळ आहे, याविषयी काही ठाम प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

सौदी अरेबियाची बलाढय़ तेल कंपनी ‘अराम्को’ आणि तीन भारतीय सरकारी कंपन्यांच्या सहभागाने रत्नागिरी जिल्ह्य़ातील नाणार येथे उभ्या राहणाऱ्या तेल शुद्धीकरण कारखान्याच्या मुद्दय़ावर शिवसेना आणि नारायण राणे हे कट्टर हाडवैरी एकत्र आले असून या संदर्भातही उद्योगवर्तुळात काही सूचक प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतात.

जवळपास तीन लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रस्तावित प्रकल्पात महाराष्ट्राचा औद्योगिक, आर्थिक चेहराच बदलण्याची क्षमता असून वरकरणी यास विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही. नाणार येथील प्रकल्पासाठीच्या तंत्रज्ञानाची उपयुक्तता आणि कार्यक्षमता सिद्ध झालेली आहे. त्यामधून कोणत्याही प्रदूषणाची शक्यता नाही. जगात या प्रकारचे प्रकल्प अनेक ठिकाणी आहेत. तेथे कोणतीही प्रदूषण समस्या उद्भवलेली नाही. अशा वेळी या प्रकल्पास विरोध करणाऱ्यांचा हेतू काय आणि त्यांचे ‘बोलविते धनी’ कोण, याचा अंदाज बांधणे अवघड नाही, अशी प्रतिक्रिया औद्योगिक क्षेत्रातील एका ज्येष्ठ व्यक्तीने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

या व्यक्तीच्या मते अशा प्रकारचे प्रकल्प महाराष्ट्रात आहेत आणि देशातही आहेत. त्यातील काही प्रकल्प हे बडय़ा उद्योगांनी उभारलेले आहेत. त्यांच्या उभारणीच्या वेळी असे कोणतेही अडथळे आले नाहीत आणि येतही नाहीत. पण सरकारी प्रकल्पांच्या वेळी मात्र नवनवे बागुलबुवे उभे केले जातात, हे कशाचे द्योतक आहे, असा प्रश्न त्यांनी केला. अन्य एका आंतरराष्ट्रीय बँकरनुसार नाणार येथील प्रकल्पामुळे भारताची तेल शुद्धीकरण क्षमता जवळपास दुप्पट होणार आहे. यामुळे काही प्रस्थापित उद्योगांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, असे सूचक विधानही या बँकरने केले. याच संदर्भात एका अत्यंत वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानेही, काही उद्योग समूह आणि नाणार विरोधक यांच्यातील कथित संबंधांबाबत शंका उपस्थित केली.

दरम्यान, कोणत्याही दबावगटाशी संबंधित नसलेले उद्योगजगतातील काही धुरीण या मुद्दय़ावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्पातून सरकारने माघार घेऊ नये, अशी मागणी करणार आहेत.