एरव्ही विषय कोणताही असो, सरकारवर किंवा सत्ताधारी पक्षांवर तुटून पडणारे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारावर मात्र सौम्य, संयत व सावध टीका केली. थेट नगराध्यक्षांच्या निवडीमुळे नगरपालिकांमध्ये राजकीय गोंधळ सुरू झाला असून, त्याचा विकासकामांवर परिणाम होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

विधान परिषदेत शुक्रवारी विरोधी पक्षांनी मुंबईसह राज्यातील अन्य महापालिका, नगरपालिका नगर पंचायती यांची ढासळणारी आर्थिक स्थिती, नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा मिळत नाहीत, चटईक्षेत्र, टीडीआर घोटाळे, शहरांच्या नियोजनाचा उडालेला बोजवारा, इत्यादी प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चर्चेचा प्रस्ताव मांडला होता.

नारायण राणे यांनी चर्चेला सुरुवात केली. राज्यात नगर पंचायती स्थापन केल्या, परंतु त्यांना निधी नाही, पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, त्यामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांना नागरी सुविधा मिळत नाहीत. केंद्राच्या योजना बंद केल्याने निधी मिळत नाही, त्याचा विकासकामांवर परिणाम होत आहे. त्यातच थेट नगराध्यक्षांची निवड करून राज्य सरकारने एक नवाच गोंधळ सुरू केला आहे.

पालिकेत बहुमत एका पक्षाला आहे, तर नगराध्यक्ष दुसऱ्याच पक्षाचा आहे, त्यातून निर्माण होणाऱ्या राजकीय संघर्षांचाही शहराच्या विकासावर परिणाम होत आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले. नगरपालिका म्हणजे राजकारणाचे फक्त अड्डे बनविले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.  मुंबई महापालिकेच्या कारभाराचे यांनी वाभाडे काढले.