दाभोलकर-पानसरे हत्येतील दुवा सापडल्याचा सीबीआयचा दावा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील समान दुवा शोधण्यात यश आल्याचा दावा सीबीआय आणि राज्य विशेष तपास यंत्रणेने (एसआयटी) शुक्रवारी उच्च न्यायालयात केला.

दाभोलकरप्रकरणी सर्व आरोपींना अटक केली असली तरी ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या ते सापडलेले नाही. महिन्याभरात त्यासाठी शोधमोहीम सुरू करू, असे सीबीआयने सांगितले. दुसरीकडे पानसरे हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली असून हल्लेखोरांना अटक करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे ‘एसआयटी’ने सांगितले. मात्र आरोपी कधी तरी सापडणारच आहे; परंतु आतापर्यंत त्याला अटक व्हायला हवी होती, असे न्यायालयाने सुनावले.

दाभोलकर-पानसरे यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली असता दोन्ही यंत्रणांनी तपासाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. त्या वेळी दाभोलकरांवर ज्या पिस्तुलाने गोळ्या झाडण्यात आल्या, त्याची ठाणे खाडीत विल्हेवाट लावण्यात आली आहे. ते शोधण्यासाठी महिनाभरात शोधमोहीम सुरू करण्यात येईल, अशी माहिती सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी दिली. त्यावर या शोधमोहिमेला विलंब करू नका; पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ती पूर्ण करा, असे निर्देश न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने दिले.

तर पानसरे हत्याप्रकरणी अद्याप हल्लेखोरांना अटक केलेली नसल्याचे एसआयटीतर्फे सांगण्यात आल्यावर दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासात समान दुवा तरी हाती लागला आहे का? अशी विचारणा न्यायालयाने केली. त्याला एसआयटीचे वकील अशोक मुंदरगी यांनी सकारात्मक उत्तर दिले.