राज्यात मात्र थंडी, नाशिक अधिक थंड
चार दिवस का होईना पण मुंबईचे महाबळेश्वर करणाऱ्या थंडगार वाऱ्यांनी शुक्रवारी काहिशी माघार घेतली आणि मुंबईकरांनी नेहमीचे उबदार वातावरण अनुभवले. एका दिवसात किमान तापमानाने तब्बल सात अंश से.ची उसळी घेतली. शुक्रवारी सकाळी पारा केवळ १८.३ अंश से.पर्यंत खाली गेला होता, तर दुपारच्या वेळेत पाऱ्याने ३२.१ अंश से.ची कमाल मर्यादा गाठली. यापुढेही किमान तापमान १५ ते १६ अंश से. दरम्यान राहील असा अंदाज वेधशाळेने नोंदविला आहे. मुंबई उबदार झाली असली तरी राज्यात मात्र गारठा वाढत आहे. राज्यातील सर्वात कमी तापमान नाशिक येथे ५.४ अंश से. नोंदले गेले आहे.
गेले चार दिवस थेट उत्तरेकडून येत असलेल्या गार वाऱ्यांमुळे मुंबईचा पारा कोसळला होता. सोमवारी १६ अंश से., मंगळवारी १३.४ अंश से., बुधवारी ११.६ अंश से. तर गुरुवारी ११.४ अंश से. किमान तापमानाची नोंद झाली.
मात्र गुरुवारी मध्य रात्रीपासून पूर्व दिशेकडून जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी दहावाजेपर्यंत पूर्वेच्या वाऱ्यांचा प्रभाव होता. उत्तरेच्या तुलनेत हे वारे कमी थंड असल्याने किमान तापमानात झालेली घसरण थांबली व पारा १८.३ अंश से. खाली गेला. तापमान वाढले असले तरी ही स्थिती सामान्य आहे, हिवाळ्यात तापमानात असे चढ-उतार येत राहतात. यापुढे किमान तापमानात १ ते २ अंश से. घट होईल असे वेधशाळेकडून सांगण्यात आले.

हुडहुडी..
मुंबई उबदार होता-होता राज्यात मात्र थंडीने जम बसवला आहे. कोकणवगळता राज्यातील बहुतांश ठिकाणी किमान तापमान १० अंश से. खाली गेले आहे. नाशिकमध्ये ५.४ अंश से., डहाणूमध्ये १२.७ अंश से., पुण्यात ७.६ अंश से., जळगाव ९.२ अंश से., महाबळेश्वर १०.९ अंश से. तर नागपूर येथे ८.१ अंश से. किमान तापमान होते. शनिवारीही किमान तापमान १० अंशाखाली राहण्याचा अंदाज आहे.

नाशिक @ ५.४!
थंडीचा मुक्काम वाढत असतानाच शुक्रवारी तापमान ५.४ अंशापर्यंत खाली घसरल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षांना तडे जाण्याची स्थिती निर्माण झाली. या पाश्र्वभूमीवर, निफाड, दिंडोरी, नाशिक तालुक्यासह द्राक्षाचे उत्पादन घेणाऱ्या पट्टय़ात रात्रभर शेकोटय़ा पेटवत उत्पादकांनी द्राक्ष बागांना थंडीपासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.