संक्रांतीच्या काळात हजारो पक्ष्यांचा जीव घेणाऱ्या पतंगांच्या मांजावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली. हा निर्णय होणे अपेक्षितच होते. आता किमान येत्या संक्रांतीच्या काळात तरी याची अंमलबजावणी होईल, अशी आशा करू या.

मांजा हे एक प्रातिनिधिक उदाहरण. पण सुखसुविधांसाठी होत असलेल्या अनेक बदलांचा परिणाम हा या खगांवर सर्वात आधी होतो. हा परिणाम दुहेरी असतो. एक तर त्यांची निवासस्थाने धोक्यात आणली जातात. दुसरा परिणाम हा थेट त्यांच्या जीवाशी खेळणारा असतो. पालिका परिसरातील पक्ष्यांची तीन प्रमुख निवासस्थाने आहेत. जंगल, पाणथळ जमिनी आणि शहरातील झाडे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, कर्नाळा पक्षी अभयारण्य त्यामानाने सुरक्षित आहेत. जंगलातील वणवे आणि शिकारी प्राणी यांच्यापासून धोका असला तरी त्यात मानवाचा हस्तक्षेप फारसा नसतो. पाणथळ जागांमध्ये तलाव, नद्या, खाडीकिनारे यांचा समावेश होतो. तुळशी, पवई हे तलाव वगळता मुंबईतील कोणताही तलाव प्रदूषणरहित नाही. कचरा टाकण्यापासून (यात निर्माल्यही आले) मलजल सोडण्यापर्यंत शहरवासीयांची मजल गेली आहे. त्यामुळे ही निवासस्थाने पक्ष्यांना आसरा देण्याच्या स्थितीत नाहीत. नद्यांची अवस्था याहून अधिक बिघडलेली आहे.

नाल्यांमध्ये परावर्तित झालेल्या या नद्यांचे पुनरुज्जीवन झाल्याशिवाय त्यांच्या पक्ष्यांना उपयोग नाही. अर्थात अशा पाण्यातही अनेकदा शुभ्र बगळे उभे राहिलेले दिसतात. पण त्यासाठी त्यांचे कौतुक करावे की कीव करावी हा प्रश्न आहे. नाही म्हणायला माहुल आणि शिवडीच्या खाडीत लहान मासे, खेकडे, बेडूक, किडे यांना वेचून खाण्यासाठी पक्ष्यांची झुंबड उडते. अशीच झुंबड उरणच्या जागेवरही उडत असे. मात्र उरणला भराव पडला आणि शिवडी, माहुल येथे बांधकाम सुरू करण्यासाठी अनेक प्रशासकीय संस्था परवानगीच्या प्रतीक्षेत उभ्या आहेत. त्यामुळे दर वर्षी येथे हजारोंच्या संख्येने येणारे स्थलांतरित पक्ष्यांना आता नव्या जागेचा शोध अपरिहार्य ठरला आहे. राहता राहिली शहरातील झाडे. लवकरच प्रसिद्ध होत असलेल्या वृक्षगणनेत शहरातील झाडांची संख्या कागदोपत्री वाढलेली दिसणार असली तरी प्रत्यक्षात दर वर्षी एक लाख वृक्षारोपण करूनही गेल्या दहा वर्षांत शहराचे जंगल झालेले नाही. त्यातच शहरात सुरू असलेल्या ‘विकास’कामांमुळे झाडांवर गंडांतर आले आहे.

पूर्वी कौलारू चाळीत छताजवळ अनेक चिमण्या घरटी करीत असत. मात्र आता हा पर्यायही काचेच्या इमारतींमुळे बंद झाला आहे. निवासस्थानांची संख्या आकुंचन पावत असल्याने पक्ष्यांच्या अनेक प्रजाती शहरातून अन्यत्र मोर्चा वळवीत आहेत. शहरात पक्ष्यांच्या १५० हून अधिक प्रजाती आहेत. मात्र शहरी वातावरण आणि धार्मिक कारण यामुळे कावळा, कबुतर वगळता इतर पक्ष्यांचे दर्शन होणे दुर्लभ होत आहे. हे झाले पक्ष्यांच्या घरांविषयी. मात्र त्यांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर आहे व तो जिव्हाळ्याचाही आहे.

पक्षी अधिक संवेदनशील असतात. वातावरणातील बदलांचा त्यांच्यावर अधिक लवकर परिणाम होतो. शिवाय ते माणसांपेक्षा अधिक काळ मोकळ्या हवेत वावरत असल्याने अनेक प्रकारच्या प्रदूषणांपासून त्यांना सुटका करून घेता येत नाही. हवा आणि पाणी प्रदूषण हे त्यातील प्रमुख भाग. वाहने, बांधकाम यामुळे हवेत सोडले जाणारे घातक वायू व सूक्ष्म धुलिकणांचा त्यांना त्रास होतो. ओझोन, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर ऑक्साइड्ससारख्या रासायनिक पदार्थामुळे मानवाप्रमाणे पक्ष्यांची श्वसनयंत्रणेवर परिणाम होतो. शुद्ध पाण्याचे स्रोत कमी झाल्याने उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्यामुळे अनेक पक्ष्यांवर वैद्यकीय उपचारांची वेळ येते. रुग्णालयापर्यंत पोहोचू न शकलेल्या पक्ष्यांची संख्या त्यापेक्षाही जास्त असते. सततचा गोंगाटही पक्ष्यांचा शत्रू आहे. या सर्व प्रकारात आता त्यांच्या धोक्यामध्ये आणखी एकाची भर पडली आहे. ती म्हणजे प्रकाशप्रदूषण. प्रकाश आणि काचेच्या खिडक्या हे द्वैत तर सर्वात घातक. रात्री प्रकाशाने उजळून निघणाऱ्या इमारतींकडे वेगाने झेप घेणारे पक्षी काचेच्या खिडक्यांना आपटून पडत असल्याच्या घटना अमेरिकेत मोजल्या जातात. भारतात तरी हा प्रकार फारसा होत नाही, मात्र त्याची मोजमापणीही झालेली नाही. शेतातील कीटकनाशके, वेगाने जाणाऱ्या कार, टेम्पो, ट्रकवर धडक, मोबाइल टॉवर हेसुद्धा पक्ष्यांच्या जीवाला धोकादायक आहेत.

महत्त्वाचे म्हणजे या सर्व कारणांमागे मानवी हात आहे. यातील बहुतांश कारणे गेल्या दहा ते पंधरा वर्षांत वेगाने वाढली आहेत; मात्र सणांसारख्या सर्व प्राणिमात्रांची काळजी घेण्याचा संदेश असलेल्या घटनांमध्येही पक्ष्यांना नाहक जीव गमावावा लागू नये. दिवाळीतील फटाके असोत वा संक्रांतीत पतंगबाजीची मजा घेताना इतरांचा जीव जाणार नाही, याची काळजी तरी किमान आपण घ्यायला हवी.

prajakta.kasale@expressindia.com