भाजप आणि शिवसेना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहेत. त्यामुळे मनसेकडून उत्तर भारतीय लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी स्टंटबाजी सुरू आहे, असे केल्याने मनसेला मराठी तरुणांचा पाठिंबा मिळेल आणि उत्तर भारतीय लोक घाबरुन भाजपला मतदान करतील. मराठी मतांचे विभाजन करण्याचा यामागचा उद्देश आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि मनसेचे साटेलोटे आहे. मुख्यमंत्र्यांची मनसेच्या स्टंटबाजीला फूस आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. मनसेच्या इंजिनला भाजपचे डिझेल मिळत असल्याचा टोला देखील मलिक यांनी यावेळी हाणला.
मनसेच्या इंजिनला भाजपचे डिझेल.. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मनसे-भाजपचे साटेलोटे @nawabmalikncp pic.twitter.com/UbNd0UWfM6
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) September 8, 2016
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मलिक यांनी राज्यात पोलिसांवर सुरू असलेल्या हल्ल्यांवरून सरकारवर चौफेर टीका केली. सध्या राज्यात कायद्याचे राज्य नसून, भाजपचे राज्य असल्याच्या मानसिकतेतून भाजप सरकार काम करत आहे. राज्यात कायद्याचे राज्य असावे, अशी अपेक्षा मलिक यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, पोलिसांना मारहाण करणाऱया लोकांमध्ये भाजपचेच जास्त लोक असल्याची परिस्थिती महाराष्ट्रात आहे. राज्यात पोलिसांच्या काम करण्याच्या पद्धतीत भाजपचा हस्तक्षेप कमी झाला पाहिजे. राज्यातील भाजप नेत्यांनी पोलिसांच्या कामातील हस्तक्षेप थांबवावा, असेही ते पुढे म्हणाले.
भाजप नेत्यांनी राज्यातील पोलिसांच्या कामातील हस्तक्षेप थांबवावा @nawabmalikncp pic.twitter.com/FQnveUI1E2
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) September 8, 2016