राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीतील नेते व कार्यकर्त्यांच्या गळतीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याच्यादृष्टीने एक विधान केले . पवारांनी म्हटले आहे की, अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे. त्यामुळे पक्षगळती होत आहे. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. ”कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी.

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाची बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून महिला व तरूणांना तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रामुख्याने विचार केला जाईल, असेही म्हटले. तसेच, पक्षाचे संघटन मजबूत करणे गरजेचे असून याद्वारेच आपल्याला आणि राज्याला फायदा होणार असल्याचे त्यांना सांगितले.

तर राज्यातील पूर परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, पूर परिस्थितीत मदतीसाठी अनेकजण सरसावले आहेत. मात्र, सर्वाधिक मदत आपल्याच पक्षाकडून करण्यात आलेली आहे. संकटाच्या काळात जो उभा राहतो त्याला लोक विसरत नाही. येत्या २० तारखेला मुख्यमंत्र्यांना पुरग्रस्तांसंदर्भात निवेदन देण्यात येईल, यावर शासनाने योग्य निर्णय घेतला नाहीतर यासाठी रस्त्यावर उतरले जाईल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. तसेच, महिला अत्याचाराच्या मुद्यावर पवार म्हणाले की, राज्यात महिलांवर अत्याचार वाढत आहे. विकृत मनस्थितींवर जरब बसवण्याची यंत्रणा कोलमडली आहे. राज्यकर्ते महिलांना सन्मानाने वागणूक देत नाहीत ते यंत्रणा काय चालवणार? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. नागपूर हे आज गुन्हेगारीचे केंद्र बनले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिथलेच आहेत. या साऱ्यांविरोधी आवाज उठवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांमध्ये आहे, असही ते म्हणाले.