महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सक्रिय आहेत. त्यामुळे पवारांच्या राजकारणाची एक वेगळी शैली महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. त्यापाठोपाठ शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचे पुतणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राजकारणात आपापली शैली निर्माण केली. पण आता पवार कुटुंबीयांची तिसरी पिढी महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं असं वलय निर्माण करण्याच्या तयारीत आहे. या पिढीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांचे चुलत बंधू महाराष्ट्र विधानसभेतील आमदार रोहित पवार आहेत. २०१९च्या निवडणुकीत रोहित पवारांसोबत थोरल्या पवारांचं नाव तर होतंच. पण त्यांनी स्वत: कर्जत-जामखेड मतदारसंघ पिंजून काढत आपण या मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून जाण्यास पात्र आहोत हे दाखवून दिलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण रोहित पवार हे नक्की काय रसायन आहे? शरद पवारांच्या मार्गदर्शन त्यांना कसं मिळतं? पार्थ पवार यांच्या राजकीय वाटचालीविषयी रोहित पवार यांचं नेमकं मत काय आहे? महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाविषयी एक तरुण नेता-आमदार म्हणून रोहित पवार कसं पाहतात? अशा सामान्य मतदारांसाठी अपरिचित रोहित पवारांना जाणून घेण्याचा प्रयत्न लोकसत्तानं केला. या मुलाखतीमध्ये रोहित पवारांनी दिलेल्या खणखणीत आणि सडेतोड उत्तरांमधून पवार कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीची राजकीय वाटचाल ठसठशीतपणे समोर येईल.