मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आज राष्ट्रवादी आपल्या जवाब दो मोहिमेमध्ये लक्ष्य केले आहे. अनेकजणांना आजही उघडय़ावरच प्रातर्विधी उरकावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत अभियानानंतरही शहरात स्वच्छतागृहांची वानवा का आहे असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे.

‘जवाब दो’ या मोहिमेअंतर्गत राष्ट्रवादीने आज ४९ वा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. या ट्विटमध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देण्यात आलेला निधी कंत्राटदारांच्या परसात रिचवला गेलाय का असा सवालही राष्ट्रवादीने मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केलेल्या ट्विटमध्ये उपस्थित केला आहे. तसेच हागणादारी मुंबईची घोषणा फसवी असल्याचे सिद्ध झाले असल्याचे सांगतानाच गांधींच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त राबवण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानानंतरही स्वच्छतागृहांची कमतरता अद्याप का आहे असंही राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांना विचारले आहे. ट्विटबरोबर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये मुंबई लोकलच्या ट्रॅकवर काहीजण शौचास बसलेले दाखवण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते

‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत राज्यात गेल्या तीन-साडेतीन वर्षांत तब्बल ६० लाख शौचालये बांधण्यात आली असून आता संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल महिन्यामध्ये केला होता. देशात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शौचालये बांधणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून आता विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना शौचालयाचा वापर करण्यास प्रवृत्त करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

मुख्यमंत्र्यांनी एप्रिल महिन्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत राज्य हागणदारीमुक्त आणि शौचालयुक्त झाल्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेला पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोतही उपस्थित होते. राज्यात सन २०१२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार केवळ ४५ टक्के कुटुंबाकडे शौचालये होती. त्यामुळे स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालये नसलेल्या ५५ टक्के कुटुंबांसाठी शौचालये बांधण्याचे आवाहनात्मक काम होते. मात्र स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने नवनवीन कल्पना राबवून उद्दीष्ट पूर्ण केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला होता.

हे ही वाचा >> ‘स्वच्छ भारत’ पथक जाताच फिरते शौचालयही गायब

रेल्वे पटरीवरील प्रातर्विधीसंदर्भात प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले होते…

मुख्यमंत्र्यांनाही पत्रकरांनी एप्रिलमधील हागदारीमुक्तीच्या घोषणेसंदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विचारला होता. राज्य हागणदारीमुक्त झाल्याचा दावा सरकार करीत असले तरी रेल्वे पटरी आणि शहरी भागात अनेक ठिकाणी लोक आजही उघडय़ावरच शौचालयास बसत असल्याचे सांगत पत्रकारांनी त्यावेळीही सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करताच नाराज झालेल्या मुख्यंत्र्यांनी ‘तुम्ही चांगल्या कामाचे कौतूक करायला हवे. केवळ नकारार्थी नजरेने पाहू नका’, असा सल्ला माध्यमांना दिला होता.

हे ही वाचा >> राज्य हागणदारीमुक्त मग सकाळी उघड्यावर शौचास बसतात ते मोर असतात का?, राज यांचा सवाल

राज यांनीही केली होती टिका

हागदारीमुक्त राज्य जाहीर करण्यावरून मुख्यमंत्र्यावर टिका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्य हागणदारीमुक्त जाहिर केल्यावरून राज्य सरकारवर ठाकरे स्टाइल टिका केली होती.

राज्य हागणदारीमुक्त केलं असाही दावा सरकारने केला आहे. असं असेल तर सकाळी जी लोकं उघड्यावर शौचास बसतात, ते काय ‘मोर’ असतात का? असा खोचक टोमणाही राज यांनी दोन महिन्यापुर्वी केलेल्या एका पोस्टमध्ये लगावला होता.