राष्ट्रीय सुरक्षेला निर्माण होणारे नवनवीन धोके आणि आव्हाने पाहता भारताकडे तिसऱ्या क्रमांकाचे लष्करी सामथ्र्य आहे, याचा अभिमान पुरेसा नाही. आपल्या मर्यादा ओळखून बदलत्या किंवा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे निर्माण होणारी आव्हाने पेलण्यासाठी नावीन्यपूर्ण युद्धतंत्र, अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि सक्षम लष्कर उभे करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मुंबईत केले.

‘फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरीटीज’संस्थेने माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन शनिवारी मुंबई विद्यापीठाच्या ‘नॅशनल सेंटर फॉर नॅनॉसायन्स अ‍ॅण्ड नॅनो टेक्नॉलॉजी’च्या सभागृहात आयोजित केले होते. ‘भारताचा सुरक्षा दृष्टिकोन २०३०’ या विषयावर जनरल रावत यांनी आपले मत मांडले. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)चे संचालक डॉ. सथीश रेड्डी तर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रत्येक वक्त्याने पर्रिकर यांच्या सरळ-साध्या, प्रामाणिक तसेच कर्तव्य कठोर स्वभावाबाबत आलेले अनुभव कथन केले.

ईशान्य भारतात नेमणुकीस असतानाचा एक अनुभव जनरल रावत यांनी सांगितला. ‘आम्ही म्यानमार म्हणजे सीमेपलीकडे एका गोपनीय कारवाईची आखणी केली होती. अंमलबजावणीपूर्वी संरक्षण मंत्री या नात्याने पर्रिकर यांनी दूरध्वनीवर माझ्याशी संपर्क साधला. शुभेच्छा दिल्या. कारवाई यशस्वी होणार, असा विश्वासही दिला. तसेच कारवाई यशस्वी झाली तर श्रेय तुमचे आणि तुमच्या जवानांचे, पण अपयशी ठरली तर ती जबाबदारी माझी, असे पर्रिकर यांनी सांगताच आत्मविश्वास दुणावला. पर्रिकर फक्त राजकीय नेते नव्हते तर ते कुशल सेनानीही होते. ते मंत्री असताना भारतात तयार करण्यात आलेल्या रणगाडे ताफ्यात होते. चाचणीदरम्यान त्यातील रेडीएटर प्रमाणापेक्षा गरम होत असत. ही बाब समजताच पर्रिकर यांनी जयपूर येथे पाऊण तास रणगाडय़ांची तपासणी केली. अडचण रेडीएटरची नसून त्यात वापरण्यात आलेल्या धातूची आहे, त्यात बदल केल्यास अडचण दूर होऊ शकेल, असा पर्याय त्यांनी सुचवला. त्यांचे निरीक्षण अचूक होते. पुढल्या काही दिवसांत पर्रिकर यांनी सुचवल्याप्रमाणे बदल केले आणि रणगाडय़ांमधील अडचणी दूर झाल्या. पर्रिकर यांनी आयआयटीमधून धातूशास्त्रात पदवी घेतली होती. त्याचा वापर त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून असा केला, असे रावत यांनी स्पष्ट केले.

येत्या काळात राष्ट्रीय सुरक्षेला निर्माण होणारे धोके हाताळणे ही जबाबदारी फक्त लष्करावरच सोपवून चालणार नाही. संपूर्ण देशाला, देशातील प्रत्येक नागरिकाला ही जबाबदारी घ्यावी लागेल, असे रावत यांनी स्पष्ट केले. आपल्या देशात डीआरडीओ, खासगी उद्योग, स्टार्टअप्स ही प्रत्येक क्षेत्रे सामथ्र्यशाली आहेत. या सर्व क्षेत्रांना एकत्र आणून, प्रोत्साहित करून भारतातच अद्ययावत शस्त्रसामुग्री, युद्धतंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सुचवले.