पार्ले कट्टा उपक्रमात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांचे मत
महाराष्ट्रात धरणांची संख्या सर्वात जास्त आहे. पावसाचे प्रमाणही इतर राज्यांच्या मानाने चांगले आहे. मात्र इथे कृषिचक्र प्रस्थापित केले गेले नाही, असे सांगतानाच महाराष्ट्रात ४० टक्के मेठे धरणे असूनही पाण्याचे प्रश्न कायम आहेत. धरती अणि लोकांचे नुकसान होऊ नये म्हणून लहान धरणे, बंधारे यांची जास्त गरज असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ मॅगसेसे पुरस्कारविजेते डॉ. राजेंद्रसिंह यांनी येथे बोलताना केले.
विलेपार्ले पूर्व येथील पार्ले कट्टा उपक्रमाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. ‘पाणी – एक बिकट समस्या’ या विषयावर डॉ. राजेंद्रसिंह यांनी आपले विचार मांडले. ‘पार्ले कट्टा’ उपक्रमाच्या या ५० व्या कार्यक्रमात डॉ. राजेंद्रसिंह यांचे विचार ऐकण्यासाठी पार्लेकर तसेच पाल्र्याबाहेरूनही रसिक श्रोते मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होते.
सामान्य शेतकऱ्यांच्या अनुभवाचा आणि पारंपरिक ज्ञानाचा उपयोग चांगल्या तऱ्हेने करून घेतला तर पाणी आणि शेतीसंबंधीचे अनेक प्रश्न सुटण्यास त्याचा खूपच उपयोग होईल हे आपण सर्वानी लक्षात घ्यायला पाहिजे, असेही डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले. राजस्थानात पाणी प्रश्न बिकट असूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची उदाहरणे नाहीत. महाराष्ट्रात मात्र ऊस उत्पादनाला प्रमाणाबाहेर महत्त्व दिल्यामुळे जमिनीचा ऱ्हास होत गेला, असे स्पष्ट मतही त्यांनी या वेळी नोंदवले.
पार्ले कट्टा उपक्रमाच्या संचालिका रत्नप्रभा महाजन यांनी आतापर्यंतचे ५० उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावणाऱ्या व्यक्तींचा फळांची परडी देऊन सत्कार केला. डॉ. राजेंद्रसिंह यांचा परिचय प्रा. स्वाती वाघ यांनी करून दिला, तर प्रज्ञा काणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.