शासनाची मान्यता नसलेल्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे शासनातर्फेच वारंवार सांगितले जात असतानाच, खुद्द राज्याचे शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मात्र एका अनधिकृत विद्यापीठातून जाणीवपूर्वक अभियांत्रिकी पदवी मिळविल्याचे उजेडात आले आहे. आपली पदवी अनधिकृत असली, तरी बोगस नाही, उलट मला पदवी देणाऱ्या विद्यापीठाचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत तावडे यांनी पदवीचे समर्थन केले असले तरी प्रदेश भाजपमध्ये मात्र या पदवी प्रकरणामुळे अस्वस्थता पसरली आहे.
शासनाची मान्यता नसलेल्या विद्यापीठातून आपण पदवी घेतली आहे, पण ती बोगस पदवी नाही, त्याबाबत काहीही लपविलेले नाही. माझ्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातही त्या पदवीचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे, असा दावा या वादानंतर तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. आपली पदवी अधिकृत शिक्षण संस्थेमधील नाही, याची कबुली खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच दिल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतेच हत्यार मिळाले आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तावडे यांनी मात्र, निरुपम यांची मागणी फेटाळून लावली.
विनोद तावडे यांनी सांगितले की, १९८० च्या दरम्यान, पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील काही निवृत्त प्राध्यापकांनी एकत्र येऊन ज्ञानेश्वर विद्यापीठ स्थापन केले होते. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच  प्रत्यक्ष कामाचा अनुभवही मिळावा, अशा प्रकारचा ब्रीज कोर्स सुरू करण्यात आला होता. त्याला आपण प्रवेश घेतला व या विद्यापीठातून १९८४ ला आपण पदवी प्राप्त केली. या विद्यापीठाला शासनाची मान्यता नव्हती, याची मला पूर्ण माहिती होती. या विद्यापीठाच्या विरोधात २००२ मध्ये कुणीतरी न्यायालयात गेले होते. न्यायालयाने हा कोर्स बंद करायला सांगितला, अशी माहिती तावडे यांनी दिली. परंतु या विद्यापीठातून  पदवी घेतली याचा मला अभिमान आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

‘तावडे ३० दिवसांत अभियंते कसे झाले? ’
मला बी. ई.ची पदवी मिळविण्याकरिता पाच वर्षे लागली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना ३० दिवसांत ही पदवी कशी मिळाली, असा सवाल करीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तावडे यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली.  शैक्षणिक पात्रतेबाबत खोटी माहिती सादर केल्याने तावडे यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, खोटी शैक्षणिक माहिती सादर केल्याप्रकरणी तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

ज्ञानेश्वर विद्यापीठ आहे तरी काय?
डॉ. मनोहर आपटे यांनी १९८० रोजी ज्ञानेश्वर विद्यापीठ सुरू केले. पुण्यातील नवी पेठेत एका सदनिकेत हे विद्यापीठ चालते. याला विद्यापीठ म्हणण्यात येत असले, तरी ते फक्त संस्थेचे नाव असून त्याला विद्यापीठाचा दर्जा नाही, असे संस्थेनेच जाहीर केले आहे. नियमित शिक्षण पद्धतीत कोणत्याही कारणास्तव शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण मिळावे या उद्देशाने ही संस्था सुरू करण्यात आली. आठव्या नियोजन आयोगाच्या अहवालात या विद्यापीठाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता द्यावी, असे नमूद करण्यात आले होते. त्यावेळी संस्थेचे संस्थापक डॉ. आपटे हेच नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. मात्र, कोणत्याही शासकीय यंत्रणेची मान्यता न घेण्याचा निर्णय या विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने घेतला. विद्यापीठाला कोणत्याही शासकीय यंत्रणेची मान्यता नाही. सध्या या विद्यापीठात इंग्रजी भाषा संभाषणाबरोबरच तांत्रिक विषयांतील विविध पदविका अभ्यासक्रम चालवण्यात येतात.

त्या पदवीच्या आधारे मी कुणाची फसवणूक केली नाही किंवा कुठल्या सवलती घेतल्या नाहीत. निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही मी ज्ञानेश्वर विद्यापीठाचा पदवीधर असल्याचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे, ही बाब मी कधीही लपवून ठेवली नाही.
-विनोद तावडे, शिक्षण मंत्री