प्रवासी वहन क्षमतेमध्ये वाढ
संपूर्णपणे नव्या विद्युतप्रणालीवर चालणारी १२ डब्यांची उपनगरी गाडी मंगळवार, २५ डिसेंबरपासून पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात प्रायेगिक तत्त्वावर सामील होत आहे. या गाडीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांमुळे या गाडीची प्रवासी वहन क्षमता सहा टक्क्यांनी वाढली असल्याचे पश्चिम रेल्वे सूत्रांनी सांगितले.
उपनगरी रेल्वेवरील गाडय़ांच्या विद्युतीकरणात बदल करण्यात आला असून १५५० व्होल्ट ऐवजी आता २५ हजार व्होल्ट दाबाचा विद्युतप्रवाह गाडय़ा चालविण्यासाठी उपयोगात येतो. सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या ताफ्यात दोन्ही विद्युतप्रणालीवर चालणाऱ्या उपनगरी गाडय़ा आहेत. नव्या दाबाच्या विद्युतप्रणालीवर संपूर्णपणे चालू शकणारी पहिली १२ डब्यांची गाडी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली आहे. या गाडीत करण्यात आलेल्या बदलांमुळे गाडीतील प्रवाशांना बसण्यासाठी तसेच उभे राहण्यासाठी जास्त जागा उपलब्ध झाली आहे. डब्याच्या आतमध्ये असल्या विद्युत यंत्रणा अधिक बंदिस्त करण्यात आली असून मोटार कोच अधिक कमी जागेत बसविण्यात आला आहे. सामानाचा डबाही मोटार कोच असलेल्या डब्याजवळ ठेवण्यात आला आहे.
सध्याच्या १२ डब्यांच्या उपनगरी गाडीमध्ये एका डब्यात प्रवासी बसण्याची क्षमता ११७४ इतकी आहे. नव्या गाडीमध्ये ही क्षमता १२४२ इतकी झाली आहे. २४ तास महिलांसाठी असलेल्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यातील बैठक क्षमता १५९ इतकी होती ती आता १७० इतकी झाली आहे.