पुण्याच्या ‘स्टार्टअप’चे संशोधन; केंद्रीय औषध प्रमाणन नियंत्रण संस्थेची मान्यता

कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी उपयुक्त असलेली द्रव ऊती परीक्षण (बायोप्सी) तंत्रज्ञान पद्धत पुण्याच्या वैज्ञानिकांनी विकसित केली आहे. कर्करोग निदानासाठी ही सर्वात जलद पद्धत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ऑन्को डिस्कव्हर तंत्रज्ञान असे या पद्धतीचे नाव असून केंद्रीय औषध प्रमाणन नियंत्रण संस्थेने त्याला मान्यता दिली आहे. या तंत्रज्ञानाने कर्करोग निदानात क्रांती होणार असून अ‍ॅक्टोरियस इनोव्हेशन्स अँड रिसर्च या पुण्यातील स्टार्टअपचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. जयंत खंदारे यांनी म्हटले आहे की, हे तंत्रज्ञान कर्करोग निदान व नियंत्रणात क्रांतिकारी ठरणार असून ऑन्को डिस्कव्हर तंत्रज्ञानाआधारे उत्पादन निर्मितीचा परवाना देण्यात आला आहे. अ‍ॅक्टोरियसने कर्करोग निदानाचे हे जलद व कार्यक्षम तंत्रज्ञान विकसित केले आहे. जैवतंत्रज्ञान संशोधन सहायता मंडळाने या स्टार्टअपला अर्थसाहाय्य दिले होते. नवीन तंत्रज्ञानाला आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले असून अनेक वैद्यकीय चाचण्यानंतर त्याला मान्यता मिळाली आहे.

मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे उपसंचालक व कर्करोगतज्ज्ञ डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी या चाचण्या केल्या आहेत. अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने अशीच चाचणी मान्य केली असून तिची किंमत १००० डॉलर्स आहे, ती भारतीय लोकांना परवडणारी नाही, ऑन्को डिस्कव्हरने शोधलेली चाचणी खूप कमी खर्चात होते. आता पुण्यातील ऑन्को डिस्कव्हर लिक्विड बायोप्सी तंत्रज्ञान प्रयोगशाळेत ही चाचणी उपलब्ध आहे. खंदारे यांना स्थूलरेणवीय रसायनशास्त्रात कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी २०११ मध्ये हुम्बोल्ट संशोधन शिष्यवृत्ती मिळाली होती. जर्मनीतील हुम्बोल्ट फाऊंडेशनचा पुरस्कार मिळालेल्या ४४ जणांना पुढे जाऊन नोबेल मिळालेले आहे.

वेळीच निदान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खंदारे व अरविंदन वासुदेवन यांनी कर्करोगाच्या पेशी शोधून काढण्यासाठी तयार केलेले तंत्रज्ञान हे मान, डोके, आतडे, स्तन यांच्या कर्करोग निदानात उपयोगी आहे. कर्करोगाच्या रक्तातील फिरत्या पेशी कमी असतात. लाखो पेशीत अशी एक पेशी सापडते ती वेगळे काढणे फार अवघड असते. गवतात सुई शोधण्यासारखा तो प्रकार आहे पण त्यात आम्हाला यश आले आहे, असे खंदारे यांनी सांगितले.