मुंबई : गेल्या महिन्यात आलेल्या नव्या वाघिणीनंतर बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणखी एका नवीन वाघाचे आगमन होणार आहे. नागपूर येथून वाघाला घेऊन खास पथक रवाना झाले असून शनिवारी सकाळी लवकर तो उद्यानात दाखल होईल.

उद्यानातील व्याघ्र विहारामध्ये सध्या बिजली (९), मस्तानी (९), लक्ष्मी (१०), बसंती (२०) आणि नुकतीच गेल्या महिन्यात दाखल झालेली एक वर्षांची वाघिण अशा पाच वाघिणी आहेत. व्याघ्र विहारात नर वाघ नसल्यामुळे नागपूर येथून सुलतान हा पाच वर्षांचा वाघ गेल्या वर्षी प्रजननासाठी आणण्यात आला. मात्र वाघिणींचे वय अधिक असल्याने प्रजनन असफल झाले. त्यानंतर अधिक वयाचा नर वाघ मिळावा, अशी विनंती उद्यान प्रशासनाने वन विभागास केली होती. त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी चंद्रपूर येथे पकडलेल्या ‘आरटी वन’ या वाघास नागपूरच्या गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातून मुंबईस आणण्यात येत असल्याचे राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि वन रक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी सांगितले. वाघाला घेऊन पथक रवाना झाले असून, शनिवार सकाळपर्यंत तो उद्यानात दाखल होईल असे त्यांनी नमूद केले. वाघाचे वय सुमारे ७ ते ८ वर्षे असून, तो प्रजननासाठी योग्य असल्याचे, राष्ट्रीय उद्यानाचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.

व्याघ्रविहार, मिनी ट्रेन सुरू

टाळेबंदीत आठ महिने बंद असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान १५ डिसेंबरपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. मात्र त्यावेळी उद्यानातील व्याघ्र विहार, मिनी ट्रेन आणि नौका विहार बंद ठेवले होते. आता व्याघ्र विहार आणि मिनी ट्रेन या दोन्ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे जी. मल्लिकार्जुन यांनी सांगितले. अद्याप नौका विहार बंद असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.