करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयआयटी बॉम्बे’ने नव्या शैक्षणिक सत्राचे अध्यापन पूर्णपणे ऑनलाइन माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. जुलैपासून पुढील शैक्षणिक सत्र सुरू करण्याचे नियोजन संस्थेने केले आहे.

मुंबईत करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नवे शैक्षणिक वर्ष कसे सुरू करावे याबाबत विद्यापीठे आणि शिक्षणसंस्था संभ्रमात आहेत. ‘आयआयटी बॉम्बे’ने मात्र नवे शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सत्रात प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन न करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेचे पहिले सत्र पूर्णपणे ऑनलाइन होणार आहे. आयआयटी बॉम्बेच्या अधिसेभेत याबाबत निर्णय झाल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. सुभाशीष चौधरी यांनी दिली आहे. जुलैपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सत्राचे वेळापत्रक, ऑनलाईन वर्ग कसे भरतील याच्या सूचना विद्यार्थ्यांना लवकरच देण्यात येतील असे संस्थेने सांगितले आहे.

संस्थेचे कामकाज मार्च महिन्यातच बंद करण्यात आले. विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्यास सांगण्यात आले. त्यानुसार आता संस्थेतील विद्यार्थी आपापल्या राज्यांमध्ये किंवा गावी गेले आहेत. संस्थेतील अध्ययन अध्यापन प्रत्यक्ष सुरू करायचे झाल्यास विद्यार्थ्यांना परत मुंबई गाठावी लागेल. संस्थेतील काही इमारतीही अलगीकरण कक्षासाठी देण्यात आल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना संस्थेन न बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याचवेळी विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यात अधिक वेळ जाऊ नये यासाठी ऑनलाईन वर्ग भरवण्याचा पर्याय संस्थेने स्विकारला आहे.

पाच कोटी रुपयांची आवश्यकता

आयआयटी बॉम्बेमध्ये विविध राज्यांतील, आर्थिक स्तरांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्याच्या राहत्या ठिकाणी संगणक, लॅपटॉप, इंटरनेट अशा सुविधा उपलब्ध नाहीत. साधने नाहीत म्हणून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठीही आयआयटी बॉम्बे प्रयत्नशील आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे साधने नाहीत त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च आहे. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी दिलेला निधीचा वापर यासाठी करण्यात येणार आहे. मात्र, तरीही अजून संस्थेला मोठय़ाप्रमाणात अर्थसहाय्य लागणार आहे. त्यामुळे माजी विद्यार्थी, कंपन्या, नागरिकांना  संचालकांनी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

पीएच.डीबाबत सूचना नाहीत

सध्या संस्थेने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग ऑनलाईन भरवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पीएच.डीच्या विद्यार्थ्यांबाबत अद्यापही काही सूचना देण्यात आलेली नाही. त्यामुळे आपले रखडेलेल संशोधनकार्य, प्रबंध पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्थेत येण्याची परवानही आहे का असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.