हॉटेल, मॉल्स २४ तास खुले ठेवण्यास कायदा-सुव्यवस्थेची अडचण नाही – देशमुख

मुंबईत २४ तास सर्व दुकाने, मॉल्स, पब्ज, हॉटेल्स, बार सुरू ठेवण्यासाठी पुरेसे पोलीस बळ उपलब्ध होईल का, याबाबत आढावा घ्यावा लागणार असला तरी २६ जानेवारीपासून तीन विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हॉटेल्स व मॉल सुरू करण्यात कोणतीही अडचण नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. यासंदर्भातील प्रस्तावावर २२ जानेवारीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर होणार असून त्यावेळी सविस्तर चर्चा होऊन निर्णय होईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

मुंबईत २६ जानेवारीपासून रात्रजीवन (नाइट लाइफ) सुरू करण्याची घोषणा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली आहे. त्याबाबत पत्रकारांनी देशमुख यांना विचारल्यावर त्यांनी पोलीस सुरक्षा उपलब्ध होण्याबाबत अडचण असल्याचे सांगितले होते.

पोलिसांवर कामाचा ताण असून अद्याप मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव नाही. त्यामुळे २६ जानेवारीपासून रात्रजीवन सुरू होण्याबाबत अडचण असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण देशमुख यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, मरिन ड्राइव्ह, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), लोअर परळ अशा तीन विभागांमध्ये बिगरनिवासी क्षेत्रात रात्रजीवन प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. सध्या तीन विभागांमध्ये मॉल्स, हॉटेल्स, बार २४ तास सुरू ठेवण्यासाठी पोलीस सुरक्षा पुरविण्यामध्ये अडचण येणार नाही. संपूर्ण मुंबईत सर्व दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू करण्यासाठी मात्र सुरक्षा व्यवस्थेवर पडणारा ताण व उपलब्ध पोलीस दल यांचा विचार करावा लागेल, असे देशमुख यांनी सांगितले.

मुंबईत २४ तास सर्व दुकाने, आस्थापना, हॉटेल्स, बार सुरू ठेवण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेक इन महाराष्ट्र चर्चासत्र व उद्योग प्रदर्शनात केली होती. त्यानंतर आवश्यक कायदेशीर दुरुस्त्या केल्या गेल्या. प्रायोगिक तत्त्वावर ती राबविण्यासाठी तीन विभागही निश्चित करण्यात आले होते. मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्दय़ावरून या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. आता महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यावर ठाकरे यांनी लगेच हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी पावले उचलली आहेत. मात्र मंत्रिमंडळ निर्णय होण्याआधीच त्यांनी २६ जानेवारीपासून रात्रजीवन मुंबईत सुरू होईल, असे जाहीर केले आणि गृहमंत्री देशमुख यांनी पोलीस सुरक्षा पुरविण्यात अडचणी असल्याचे सांगितल्यावर हा निर्णय लांबणीवर जाण्याची चर्चा सुरू झाली होती.

..मगच निर्णय- पवार

पिंपरी : मुंबईप्रमाणे २४ तास हॉटेल व मॉल  सुरू करण्याचा प्रस्ताव पुणे, पिंपरी-चिंचवडसारख्या शहरांकडून आल्यास त्याविषयी विचार करू, असे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले असतानाच, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. मुंबईत याबाबत कसा प्रतिसाद मिळतो आहे, ते पाहूनच पुण्यात काय करायचे ते ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले.