शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये रविवारी अनेक पक्षांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. ट्विटवरुनही अनेक दिग्गज नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. माजी खासदार निलेश राणे यांनीही ट्विटवरुन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली मात्र त्याच वेळी त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

निलेश यांनी रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करतो असं सांगणारे एक ट्विट केले. “लाखोंच्या मनावर अधिराज्य करणारे शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन,” असं निलेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

त्यानंतर दुपारी सव्वा एकच्या सुमारास निलेश यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनावरुनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत एक ट्विट केले. यामध्ये बाळासाहेब जाऊन सात वर्ष झाली तरी त्यांचे जगाला दाखवता येईल असं एकही स्मारक बांधता आले नाही असं म्हणत याबद्दल बाळासाहेबांचे पुत्र असणाऱ्या उद्धव यांना लाज वाटली पाहिजे असं निलेश आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. “७ वर्ष झाली बाळासाहेब जाऊन पण आज ही जगाला दाखवण्यासाठी व बाळासाहेबांना शोभेल अशी एक ही वास्तू किव्हा स्मारक झालेलं नाही. लाज वाटली पाहिजे उद्धवला,” असं ट्विट त्यांनी केलं होतं.

दरम्यान, याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९३वी जयंतीच्या निमित्ताने गणेशपुजन करुन महापौर बंगला येथील प्रस्तावित स्मारकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. राज्य मंत्रीमंडळाने या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांचा निधीला मंजूरी दिली आहे. शिवाजी पार्कजवळ असलेल्या महापौर बंगल्यामध्ये बाळासाहेबांचे स्मारक उभारले जाणार आहे. ११,५०० चौरस मीटर एवढ्या मोक्याच्या जागी हे स्मारक होणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून गेल्या वर्षी स्मारकासाठी महापौर बंगल्याची ही जागा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्टकडे हस्तांतरीत केली आहे.