देशभरातील सर्वोत्तम विद्यापीठांसाठी क्रमवारीत पहिल्या दहाच नव्हे तर शंभरातही येण्याची कामगिरी बजावता न आल्याचे खापर मुंबई विद्यापीठाने ‘आकडेवारी’बाबत झालेल्या गोंधळावर फोडले आहे.

विद्यापीठाअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘इंटरनल क्वालिटी अ‍ॅश्युरन्स सेल’च्या माध्यमातून २०१७च्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट रॅकिंग फ्रेमवर्क’करिता (एनआयआरएफ) माहिती सादर करताना गोंधळ झाल्यामुळे कदाचित मुंबई विद्यापीठ पहिल्या १००मध्ये नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा विभाग विद्यापीठाचे विद्यार्थी-शिक्षक प्रमाण, संशोधन, परिषदा आदी गुणवत्तेसंबंधी आवश्यक ती माहितीचा लेखाजोखा ठेवतो. मात्र, या विभागाकडून माहिती सादर करताना काहितरी घोळ झाल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. ‘आम्हाला आमच्या कामगिरीवर विश्वास आहे. मात्र या गोंधळामुळे मुंबई विद्यापीठाच्या केंद्रीय क्रमवारीतील स्थानाबाबत घोळ झाला असावा. त्यामुळे एनआयआरएफकरिता नव्याने माहिती सादर केली जाईल,’ असा खुलासा विद्यापीठाने केला आहे.

‘गेली दोन वर्षे अभ्यासक्रम आखताना, तो राबविताना झालेले गोंधळ, सदोष परीक्षा पद्धती, त्यामुळे बिघडलेले अध्यापनाचे वेळापत्रक अशा सर्वच पातळींवर मुंबई विद्यापीठ अनुत्तीर्ण होत आहे. आता आकडेवारीच्या व्यवस्थापनाबाबतही विद्यापीठाचा गोंधळी कारभार समोर आला आहे. त्यामुळे या क्रमवारीत विद्यापीठाची कामगिरी घसरली तरी त्यात आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही,’ अशी टीका बुक्टू या प्राध्यापकांच्या संघटनेमार्फत व्यक्त होत आहे. तर ‘मुळात क्यूएस, ब्रिक्स देशांच्या यादीत स्थान मिळविणारे मुंबई विद्यापीठ एनआयआरएफमध्ये का नाही, असा प्रश्न पडतो. म्हणूनच कोणत्याही शिक्षणसंस्थेचा दर्जा या प्रकारच्या क्रमवारीवर ठरू नये. अनेकदा ही आकडेवारी धूळफेक करणारी ठरते,’ अशी प्रतिक्रिया विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नीरज हातेकर यांनी व्यक्त केली.

मुंबईतील केंद्रीय-खासगी संस्था क्रमवारीत आघाडीवर

मुंबई विद्यापीठ क्रमवारीत कुठेच नसले तरी या महानगरीतील आयसीटी, एचबीएनआय, आयआयटी, टीआयएसएस, एनएमआयएमएस, वेलिंगकर्स, के. जे. सोमैय्या (तिनही व्यवस्थापन शास्त्र) सारख्या केंद्रीय व खासगी शिक्षण संस्थांनी मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जवळपास ७०० महाविद्यालयांचा कारभार हाकणारे मुंबई विद्यापीठ या क्रमवारीत विद्यापीठांच्या यादीत पहिल्या १००मध्ये नाही. परंतु, मुंबईतील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट, इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल स्टडीज, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रीअल इंजिनिअरिंग आदी केंद्रीय शिक्षणसंस्थांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन शास्त्र अशा विविध संस्थांसाठीच्या क्रमवारीत स्थान मिळविले आहे.

औषधनिर्माणशास्त्रातील स्थिती (कंसात क्रमवारी)

इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई (४), पूना कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे (८), बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई (१५), वाय. बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी, औरंगाबाद (२४), प्रि. के. एन. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई (२९), संजीवनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोपरगाव (३२).

शंभरात यांचा समावेश (कंसात क्रमवारी)

राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, पुणे (३०), फर्गसन महाविद्यालय, पुणे (३५), डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती (३६), सेंट झेविअर्स, मुंबई (४०), विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (५०), नांदेड एज्युकेशन सोसायटी सायन्स कॉलेज (७२), सिम्बायोसिस कॉलेज, पुणे (८१), जानकीदेवी बजाज कॉलेज ऑफ सायन्स, वर्धा (८८), भारती विद्यापीठ मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, सांगली (९९).