महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशामुळे शिवसेना-भाजप यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर Uddhav Thackeray निशाणा साधला आहे. ‘वाजले की बारा’ अशा शीर्षकाखाली नितेश राणेंनी Nitesh Rane एक व्यंगचित्र ट्विट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्या भेटीने उद्धव ठाकरेंची झोप उडाल्याच्या आशयाचे हे व्यंगचित्र आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनेकदा व्यंगचित्रातून विरोधकांवर प्रहार करायचे. त्याच पद्धतीने आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नितेश राणेंनी या व्यंगचित्राला ‘वाजले की बारा!’ असे शीर्षक दिले आहे. नितेश राणे यांनी हे व्यंगचित्र व्हॉट्सअप स्टेटस म्हणूनही ठेवले आहे. आता नितेश राणेंच्या या व्यंगचित्राला शिवसेनेकडून काय उत्तर दिले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. तर राणे यांनी मंत्रिमंडळात प्रवेश मिळू नये, यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र मुख्यमंत्री फडणवीस राणेंना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.