ठाण्याच्या पूर्वेकडील वेशीला स्पर्श करत अनेक वर्षे सिडको डेपोपर्यंतच सेवा पुरविणाऱ्या नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) बुधवारपासून पाचपाखाडी, हरिनिवास, तीनहात नाका, जांभळी नाका, ठाणे रेल्वे स्थानक अशा प्रमुख नाक्यांपर्यंत आपल्या बससेवेचा विस्तार केला. ‘एनएमएमटी’च्या या सीमोल्लंघनामुळे ठाणेकरांना मुंबई आणि नवी मुंबईच्या दिशेने ये-जा करण्यासाठी वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
‘एनएमएमटी’ने वाशी रेल्वे स्थानकापासून बोरिवली स्थानकापर्यंत १२५ क्रमांकाची वातानुकूलित व्हॉल्वो बससेवा सुरू केली आहे. ही बस ऐरोली-भांडूप-पवईमार्गे बोरिवलीपर्यंत नेली जावी, असा सुरुवातीचा प्रस्ताव होता. याच मार्गावर एनएमएमटीची १२३ क्रमांकाची बस धावते. त्यामुळे बोरिवलीपर्यंत सुरू करण्यात आलेला हा नवा मार्ग ठाण्यातून नेला जावा, असा प्रस्ताव पुढे आला. वाशी-ऐरोली-ठाण्याच्या घोडबंदरमार्गे ही बस बोरिवलीकडे नेण्याचा प्रस्ताव होता. मात्र, ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीची गरज लक्षात घेऊन मूळ शहरातून या बससाठी मार्ग करून देण्यात आला आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी लोकसत्ताला दिली.
सद्य:स्थितीत वाशी-ठाणे-बोरिवली या मार्गावर दररोज १० वातानुकूलित बसेस सोडल्या जात आहेत. या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने लवकरच ३० बसेस सोडण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बेस्टनंतरची दुसरी सेवा
‘बेस्ट’नंतर ठाणे शहरात प्रवेश करणारी ‘एनएमएमटी’ ही दुसरी परिवहन सेवा ठरली आहे. टीएमटीकडून चालविण्यात येणाऱ्या बसेस ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरातील अंतर्गत वाहतुकीची धमनी मानल्या जातात. मात्र, ढिसाळ नियोजन आणि सतत नादुरुस्त होणाऱ्या या बस सेवेविषयी ठाणेकर फारसे समाधानी नाहीत. त्यामुळे टीएमटीच्या बसगाडय़ा ‘बेस्ट’कडे वर्ग करण्याचा प्रस्ताव मध्यंतरी शहरातील काही राजकीय नेत्यांनी मांडल्याने वादंग उठले होते.
बेस्टचे ठाण्यातील मार्ग
लोकमान्यनगर, पवारनगर, तीनहात नाका, कोपरी, कळवा, खारेगाव, बाळकूम, घोडबंदर, कोपरी ते बोरिवली आणि कॅडबरी ते मंत्रालय, असे बेस्ट बसचे ठाण्यातील मार्ग आहेत. मात्र, बेस्टच्या बसेस मूळ शहरात अंतर्गत वाहतूक करत नाहीत.