वरळीच्या शुभदा सहकारी गृहनिर्माण सोसायटीत आपला एकच फ्लॅट असून त्या सोसायटीतील अनधिकृत बांधकामाशी तसेच मुंबई महापालिकेने नोटीस बजावलेल्या कंपनीशी आपला कोणताही संबंध नाही, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
अनधिकृत बांधकामाबद्दल मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजाविलेल्या शुभदा सोसायटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठ सदनिका असल्याचा आरोप या सोसायटीचे अध्यक्ष व काँग्रेसचे माजी प्रांताध्यक्ष रणजित देशमुख यांनी शुक्रवारी केला होता. हा आरोप निराधार आणि पूर्णपणे चुकीचा असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. या सोसायटीमधील अनाधिकृत बांधकामप्रकरणी मुंबई महापालिकेने नॉनकॉन कंपनीला नोटीस पाठविली आहे, त्यात गाळेधारक आणि मालक म्हणून आपल्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र २००९ मध्येच आपण या कंपनीचा राजीनामा दिला असून तेव्हापासून या कंपनीशी आपला कोणताही संबंध नाही. संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाव वगळण्याबाबत तसेच संबंधित यंत्रणांना कळविण्याची जबाबदारी कंपनीची होती. त्यांनी ती पूर्ण न केल्यामुळे नोटिशीत आपल्या नावाचा उल्लेख झाल्याचे पवार यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.