|| शैलजा तिवले

जेजे आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाचा नकार

अवयव प्रत्यारोपणासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणारी राज्याची अधिकृत समिती स्थापण्यासाठी जे.जे. आणि सेंट जॉर्ज या रुग्णालयांनी नकार दिल्याने तूर्त याचा कार्यभार वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन (डीएमईआर) संचालनालयाकडेच राहणार आहे.

राज्यस्तरावर जे.जे. रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य अधिकृत समिती कार्यरत होती. समितीतील समन्वयक तुषार सावरकर याने मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या परवानगीसाठी रुग्णाच्या नातेवाईंकाकडे लाच मागितली होती. या प्रकरणी लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली. त्यानंतर ‘डीएमईआर’ने ही समिती बरखास्त करून कार्यभार स्वत:कडे घेतला होता.

लाच प्रकरणानंतर समितीचा अभ्यास करण्यासाठी ‘डीएमईआर’ने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने केलेल्या सूचना विचारात घेऊन नवीन समितीची नियुक्ती करण्यात येईल असा निर्णय घेतला गेला. दरम्यान ही समिती जे.जे. रुग्णालयाऐवजी सेंट जॉर्ज रुग्णालयात नेमण्यात यावी, असा प्रस्ताव जे.जे. रुग्णालयाने ‘डीएमईआर’कडे दिला. त्यानंतर नव्या समितीची स्थापना सेंट जॉर्ज रुग्णालयात होईल अशी चिन्हे दिसत होती. मात्र सेंट जॉर्ज रुग्णालयानेही या समितीचा कार्यभार सांभाळण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे आता नव्या समितीचा भार कोणाकडे द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार निर्णय घेईपर्यंत तरी या समितीचा कारभार ‘डीएमईआर’कडेच आहे.

‘डीएमईआर’ समर्थ

लाच प्रकरणानंतर दोन्ही रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षकांनी या समितीची जबाबादारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. समिती बरखास्त झाल्यापासून हा कार्यभार ‘डीएमईआर’ योग्य रितीने सांभाळत आहे. त्यामुळे ही जबाबदारी सुरळीतपणे पार पाडण्यास ‘डीएमईआर’ समर्थ आहे. यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून त्यांचे प्रशिक्षणही सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची कोणतीही गैरसोय न होता वेळेत सेवा दिली जात असल्याचे ‘डीएमईआर’चे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.