अभिनेता सुमित राघवनकडून देखभालीचा खर्च

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटय़ा बचाव केंद्रात नांदणाऱ्या ‘तारा’ नामक बिबटय़ाच्या नऊ महिन्यांच्या गोंडस मादी पिल्लाचे पालकत्व अभिनेता सुमित राघवन यांनी स्वीकारले आहे. वन्य प्राणी दत्तक योजनेअंतर्गत सुमित यांनी ‘तारा’च्या पालनपोषणाची जबाबदारी उचलली आहे. विशेष म्हणजे वन्यप्राणी दत्तक योजनेत सहभागी झालेले सुमित हे पहिले ‘सितारा’ असल्याने आणखी कलाकार यासाठी पुढे येण्याची आशा व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षी १९ डिसेंबर रोजी  अहमदनगर येथील एका गावातील उसाच्या शेतात सूरज आणि ताराचा जन्म झाला होता. मात्र ऊसतोडणीच्या वेळी माणसांना पाहून बिथरलेली त्यांची आई आपल्या दोन पिल्लांना त्याच ठिकाणी टाकून पसार झाली. या पिल्लांना तीन दिवस त्याच ठिकाणी ठेवून त्यांची आई त्यांना न्यायला येण्याची प्रतीक्षा वन अधिकाऱ्यांनी केली. मात्र मादी बिबटय़ा तेथे फिरकलीच नाही. त्यामुळे या दोन्ही पिल्लांना राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात आले. त्या वेळी ही दोन्ही पिल्ले अशक्त होती. मात्र उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली पिल्लांची योग्य काळजी घेण्यात आली. सूरज आणि तारा काही काळ पशुवैद्यकीय रुग्णालयातही उपचारासाठी दाखल होते. डॉ. पेठे यांनी ताराला अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून वाचवले. या वर्षी मार्च महिन्यात या दोन्ही पिल्लांना बिबटय़ा बचाव केंद्रात सोडण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी दत्तक कराराचे कागदपत्र वनाधिकाऱ्यांच्या हवाली करून नऊ महिन्यांच्या ‘तारा’चे पालकत्व अभिनेता सुमित राघवन आणि त्यांची पत्नी चिन्मयी यांनी स्वीकारले आहे.   गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय उद्यानात सुरू असलेल्या वन्य प्राणी दत्तक योजनेअंतर्गत केवळ १६ प्राणिप्रेमींनी १९ वन्यजीवांना दत्तक घेतले आहे. वन्य प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचा अभाव आणि जुन्या दत्तकधारकांनी दत्तक करार नूतनीकरणासाठी दाखविलेला निरुत्साह यामुळे प्रशासनासमोर योजना गुंडाळण्याची वेळ आली आहे. मात्र आता सुमित राघवन यांनी ताराला दत्तक घेतल्यामुळे योजनेला पुन्हा चांगले दिवस येण्याची चिन्हे आहेत. दत्तक योजनेअंतर्गत बिबटय़ाला दत्तक घेण्यासाठी विहित करण्यात आलेले दत्तकमूल्य भरून ताराच्या वैद्यकीय खर्चापासून तिच्या पालनपोषणाची जबाबदारी सुमित आणि त्यांची पत्नी चिन्मयी यांनी उचलली आहे.

ताराच्या रूपाने माझ्या कुटुंबात तिसऱ्या अपत्याचे आगमन झाले आहे. प्राण्यांच्या संवर्धनाबाबत केवळ कौतुक करून वन विभागाचे आभार मानने योग्य नाही. तर एक पाऊ ल पुढे टाकून मुंबईकर म्हणून राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे आपलेही कर्तव्य आहे. याच भावनेने दत्तक योजनेअंतर्गत आम्ही ताराचे पालकत्व स्वीकारले आहे.

-सुमित राघवन, अभिनेता

अभिनेता सुमित राघवन यांनी ‘तारा’ हिला दत्तक घेतल्यामुळे वन्य प्राणी दत्तक योजनेला बळकटी निश्चितच मिळेल. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या मान्यवरांनी प्राण्यांच्या संवर्धनासाठी पुढे येऊन वन विभागाला सहकार्य करणे आवश्यक आहे.

– संजय वाघमोडे, वन अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान