04 April 2020

News Flash

‘मुंबईतील रस्त्यांवर एकही खड्डा नाही’; पालिका स्थायी समितीच्या सभापतींचा दावा

"जर मुंबईच्या रस्त्यावर खड्डा दिसल्यास तो दोन तासांमध्ये बुजवला जाईल"

यशवंत जाधव

पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबईकर हैराण झालेले असतानाच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने शहरामध्ये एकही खड्डा नसल्याचे अजब वक्तव्य केले आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांनी हा अजब दावा केला आहे.

शिवसेनेचे नगरसेवक असणाऱ्या जाधव यांनी ‘मी मुंबईच्या रस्त्यांवरुन रोज प्रवास करतो. मी मुंबईच्या रस्त्यांवर आजपर्यंत एकही खड्डा पाहिलेला नाही,’ असं सांगितलं आहे. मुंबईतील रस्त्यावर खड्डे नसल्याचे सांगतानाच काही खड्डे असले तर ते केवळ मेट्रोच्या कामांमुळे असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. ‘मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा नाही. तुम्ही मला एखादा तरी खड्डा दाखवाच. माझ्यासारख्या रोज प्रवास करणाऱ्याला एकही खड्डा दिसलेला नाही. जर मुंबईच्या रस्त्यावर काही खड्डे असतील तर ते मेट्रोचे बांधकाम सुरु असल्याने झाले आहेत. पण मी खात्रीने सांगू शकतो की मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे नाहीत,’ असं जाधव यांनी म्हटलं आहे.

मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे नाही असा दावा करण्याबरोबरच कोणत्याही मुंबईकराला रस्त्यावर खड्डा दिसल्यास तो केवळ दोन तासांमध्ये बुजवला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.

सालाबादप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईकरांना खड्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या वर्षी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांनी सात जणांचा बळी घेतला असून अनेकजण वेगवेगळ्या छोट्या अपघातांमध्ये जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच वांद्रामधील एका ४७ वर्षीय रिक्षा चालकाचा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

दोनच दिवसापूर्वी मुंबईमधील पूर्व द्रूतगती मार्गावर बाईकवरुन जाणाऱ्या एक दांपत्याचा अपघात झाला. बाईकचे चाक रस्त्यामधील खड्ड्यात अडकल्याने झालेल्या अपघातामध्ये बाईकवरील दोघेही १० फुटांपर्यंत फरपटत गेले. या अपघातानंतर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अख्त्यारित येतो असं सांगत आपले हात झटकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2019 11:51 am

Web Title: not a single pothole in mumbai claims bmcs standing committee chairman scsg 91
Next Stories
1 गणेशभक्तांचा परतीचा प्रवासही खडतरच
2 योजना अपूर्ण ठेवलेल्या विकासकाचा नवा प्रकल्प रोखणे अशक्य!
3 गणेश विसर्जनाला हलक्या पावसाची शक्यता
Just Now!
X