गोरेगावमध्ये नाल्यानजीक पालिकेचा फलक

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकर नगरातील नाल्याजवळ ‘नाल्यात पडून दुर्घटना झाल्यास पालिका जबाबदार नाही!’ अशा अर्थाच्या मुंबई महापालिके ने लावलेल्या फलकामुळे वाद उद्भवला आहे. पावसामुळे नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन दुर्घटना होतात. म्हणून पालिके ने अंध, अपंग व लहान मुलांची काळजी घ्यावी, असाही इशारा देणारा फलक या ठिकाणी लावला आहे. मात्र गेल्या वर्षी याच ठिकाणी कुटुंबीयांची नजर चुकवून नाल्याजवळ गेलेला एक दीड वर्षांचा मुलगा नाल्यात पडून वाहून गेला होता. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये या फलकावरून नाराजी आहे.

गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकर नगरातील भारतभाई चाळीत गेल्या वर्षी १० जुलै रोजी दीड वर्षांचा एक मुलगा उघडय़ा नाल्यात पडून वाहून गेला. या प्रकरणामुळे महापालिकेला खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या वर्षी खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने या चाळीच्या दोन्ही टोकांना असे बोर्ड लावले आहेत. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, अन्यथा पालिका जबाबदार राहणार नाही, असे म्हणून पालिकेने आपली जबाबदारी झटकल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.

या दुर्घटनेची आठवण करून देणाऱ्या या फलकामुळे दिव्यांशचे कुटुंबीयदेखील व्यथित झाले आहे. पालिकेच्या पी दक्षिण विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त देवीदास क्षीरसागर यांच्याशी याबाबत विचारणा करण्याचा

प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. मात्र जिथे नाले साफ केले, तिथे आम्ही नाल्यात कचरा टाकू नये, असे आवाहन करणारे फलक लावले आहेत. मात्र उपरोक्त फलक विभाग कार्यालयांनी लावला आहे का याबाबत आपल्याला माहिती नसल्याची प्रतिक्रिया पर्जन्यजल वाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

जबाबदारी झटकण्याचे काम

काही वर्षांपूर्वी डॉ. दीपक अमरापूरकर हे मॅनहोलमध्ये पडून वाहून गेल्यानंतर पालिकेच्या बेजबाबदारपणावर प्रचंड टीका झाली होती. मात्र त्यातून पालिकेने काहीही धडा घेण्याऐवजी जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे. दरवर्षी पावसाळ्यात उघडय़ा नाल्यात पडून दुर्घटना होण्याचे प्रमाण मोठे आहे. या वर्षीही ११ जून रोजी घाटकोपर येथील पंतनगर पोलीस चौकीच्या परिसरात सावित्रीबाई फुले नगरच्या जवळून जाणाऱ्या नाल्यात पडून तीन वर्षांचा मुलगा वाहून गेला.