मुंबईत करोनाने आतापर्यंत १,०२६ जणांचा बळी घेतला आहे. राज्यात सोमवारी २,४३६ रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५२,६६७ वर पोहोचली आहे.

राज्यात करोनाने सोमवारी ६० जणांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईतील ३८, पुण्यातील ११ जणांचा समावेश आहे. राज्यभरात सोमवारी १,१८६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यातील सर्वाधिक ९०० जण मुंबई विभागातील आहेत. राज्यातील एकूण मृतांची संख्या १६९५ वर पोहोचली आहे. राज्यभरात आतापर्यंत १५ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

देशात दिवसभरात ६,९७७ नवे रुग्ण

देशात सलग चौथ्या दिवशी करोनाबाधितांची संख्या सहा हजारांहून अधिक नोंदविण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे ६,९७७ रुग्ण आढळले. त्यामुळे देशभरात रुग्णांची संख्या १ लाख, ३८ हजार ८४५ झाली आहे. जगभरातील सर्वाधिक दहा करोनाबाधित देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. देशातील ५७,७२० रुग्ण बरे झाले असून, हे प्रमाण ४१.५७ टक्क्यांवर पोहोचले आहे. ७७ हजार १०३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, देशात ४२२ सरकारी व १७७ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा कार्यरत असून दररोज दीड लाख नमुना चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली.