स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या प्रगतीत शेतीचे योगदान मोठे आहे. पण त्यात सामान्य शेतकऱ्याच्या पदरात काय पडले? न्याय मिळाला का? यापुढच्या काळात राज्याच्या प्रगतीत शेतीचा टक्का कितपत असेल.. ‘शेतीमुळे सहकारक्षेत्र वाढले आणि सहकाराच्या पाठबळाने शेती’. पण या समीकरणात असे काय फिस्कटले की शेतकरी हा आपणच ‘भागधारक’ असलेल्या कारखान्यांच्या विरोधात उठला? हे नाते कसे सुधारणार? बदलत्या काळात शेतीमध्ये अणुविज्ञानाचा काय लाभ होऊ शकतो, भयंकर समजला जाणारा किरणोत्सार शेतमालासाठी फायद्याचा कसा? या व अशा अनेक प्रश्नांची, शंकांची उत्तरे ‘लोकसत्ता’तर्फे पुण्यात होत असलेल्या ‘शेती आणि प्रगती’ या चर्चासत्रातील पहिल्या दिवशी मिळतील. सहभागी तज्ज्ञ बदलत्या तंत्राचे दिशादिग्दर्शनही करतील.
‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’ने सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमात २४ आणि २५ फेब्रुवारीला ‘शेती आणि प्रगती’ या विषयावर पुण्यात दोन दिवसीय चर्चासत्र होत आहे. कोरेगाव पार्क येथील ‘व्हिवांता बाय ताज ब्लू डायमंड’ येथे हे चर्चासत्र पार पडणार आहे.
२४ फेब्रुवारी रोजी ‘महाराष्ट्राची शेती व प्रगती’ या उद्घाटनाच्या सत्रात ज्येष्ठ कृषीअर्थतज्ज्ञ शरद जोशी, सहकारातील बुजुर्ग नेते शंकरराव कोल्हे मार्गदर्शन करतील. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या प्रगतीचा इतिहास पाहता त्यात शेती व सहकारी चळवळीच्या विकासाचे मोठे योगदान आहे.
औद्योगिक विकास होत असताना शेतीतही स्थित्यंतरे होत गेली. प्रगतीच्या वाटेवरील महाराष्ट्राची वाटचाल आणि शेतीचा प्रवास यांच्या  सद्यस्थितीचा, प्रश्नांचा आढावा हे तज्ज्ञ घेतील.
‘शेती व सहकार’ या दुसऱ्या सत्रात सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांच्या पिळवणुकीविरोधात एल्गार पुकारणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी, अर्थतज्ज्ञ प्रदीप आपटे आणि कृषीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक हे सहभागी होणार आहेत.
सहकारी साखर कारखान्यांची चळवळ सुरू झाली आणि महाराष्ट्रातील शेतीचे रूप बदलत गेले. उसाचे क्षेत्र बघता बघता वाढले. सधन शेतकऱ्यांची संख्याही वाढली. सहकारी दूध संघ, पतपेढय़ा यांच्या माध्यमातून शेतकरी आणि शेतीला जोडधंदा मिळाला. ग्रामीण भागात उत्पादकतेला चालना मिळाली. पण त्याचबरोबर हळूहळू शेतकरी आणि शेतीवर सहकार क्षेत्रातील नेत्यांचे वर्चस्व निर्माण झाले. सहकार चळवळीचे रूपांत स्वाहाकारात होत गेले. शेतकऱ्यांचे शोषण व्हायला लागले. शेती व सहकाराच्या या परस्पर संबंधांचा ऊहापोह या सत्रात होईल.
तर ‘शेती- नवे तंत्र, नवे वाण, नवे ज्ञान’ या सत्रात भाभा अणुसंशोधन केंद्राच्या अणुशेती व जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख पद्मश्री शरद काळे, ‘जैन ठिबक सिंचन’चे अतुल जैन, इस्रायलचे वाणिज्यदूत जोनाथन मिलर आणि आनंद कर्वे बदलत्या शेतीतंत्रज्ञानाचा पट उलगडून सांगतील.
काळाच्या ओघात शेतीच्या स्वरूपात बदल होत गेले. ठिबक सिंचन असो की बियाणांचे नवीन वाण अथवा ‘ग्रीन हाऊस’.. शेतीमध्ये नवीन तंत्राला चांगलेच महत्त्व आले. शेतकऱ्यांनीही ते कमी-अधिक प्रमाणात स्वीकारले.
बहुतांश शेतकऱ्यांना या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान-ज्ञानाचा लाभ कसा घेता येईल याची चर्चा या सत्रात होईल.