प्रसाद रावकर

पोलीस यंत्रणेच्या प्रक्रिया पूर्ण न केल्याने फटका; परवानगी नाकारलेल्या मंडळांना नव्याने संधी

गणेशोत्सवाला अवघे १५ दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईमधील रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजऱ्या करणाऱ्या तब्बल १००४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अद्याप मंडप उभारण्याची परवानगी मिळालेली नाही. वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस ठाण्यांमधील प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे मंडळांना अद्याप परवानगी मिळू शकलेली नाही. त्याच वेळी १८९ मंडळांच्या अर्जामधील त्रुटींमुळे मंडप परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र या मंडळांना परवानगीसाठी पुन्हा अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे रस्ता, पदपथ अडवणाऱ्या सार्वजनिक मंडळांना मंडप उभारण्यास परवानगी देऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच न्यायालयाने पालिकेला याबाबत धोरण आखण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार पालिकेने धोरण आखले असून काही अटीसापेक्ष रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्यास परवानगी देण्यात येत आहे. अग्निशमन दलाचा बंब, रुग्णवाहिका जाईल इतकी जागा सोडून, तसेच वाहतूक आणि पादचाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन मंडप उभारण्यास परवानगी देण्यात येत आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांना पालिका कार्यालय, स्थानिक पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलिसांकडे खेटे घालावे लागू नये यासाठी पालिका प्रशासनाने मंडप परवानगी ऑनलाइन पद्धतीने देण्यास सुरुवात केली आहे.

यंदा रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याकरिता मंडळांकडून पालिकेला ऑनलाइन पद्धतीने २,६२० अर्ज सादर करण्यात आले होते. सुमारे ४२२ मंडळांनी दोन वेळा अर्ज सादर केले होते. त्यामुळे ४२२ अर्ज बाद करण्यात आले, तर २,१९८ अर्जाची छाननी सुरू करण्यात आली. यापैकी १००५ मंडळांच्या मंडपांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या मंडळांना मंडप उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र अर्जामधील त्रुटींमुळे १८९ मंडळांना मंडप परवानगी नाकारण्यात आली असून या मंडळांना मंडप परवानगीसाठी अर्ज करण्याकरिता पुन्हा संधी देण्यात येणार आहे. उर्वरित तब्बल १००४ मंडळांच्या अर्जावर परवानगी देण्याविषयी अद्याप प्रक्रिया सुरू आहे. काही अर्ज स्थानिक पोलिसांच्या तर काही अर्ज वाहतूक पोलिसांच्या ‘ना हरकती’च्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पालिकेकडून या मंडळांना अद्याप मंडप परवानगी देण्यात आलेली नाही.

गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर आला आहे. अद्याप मंडप परवानगी न मिळाल्यामुळे या मंडळांचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. काही मंडळांनी हाती परवानगी नसतानाही नियमानुसार मंडप उभारण्यास सुरुवात केली आहे. मात्र पालिकेने परवानगी नाकारल्यास काय करायचे, असा प्रश्न या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे.

परवानगीसाठी मुदतवाढ

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि विविध संस्था-संघटनांनी केलेल्या मागणीनुसार आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाशी केलेली चर्चा यामुळे पालिकेने मंडप परवानगीसाठी मुदतवाढ दिली आहे. आता मंडळांना २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी १९ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती.