ई-निविदा जारी; नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पुढाकार

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्या कारकीर्दीत मोठय़ा प्रमाणात नस्ती निकालात काढण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे एकूणच प्राधिकरणातील प्रचंड अनागोंदी उघड झाली. त्यामुळे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी पुढाकार घेऊन प्राधिकरणातील मानवी लुडबुड कायमची बंद करण्याचे ठरविले. संपूर्ण प्रक्रिया संगणकीय करण्यासाठी शुक्रवारी ई-निविदा जारी करण्यात आली. यामुळे आता प्राधिकरणातील आवक-जावक नोंदवहीही कायमची हद्दपार होणार आहे.

यापुढे आवक-जावक नोंदवहीच हद्दपार करून प्रत्येक नस्तीची संगणकीकृत नोंदणी होईल. त्यामुळे उपअभियंता, सहायक अभियंता, उपमुख्य अभियंता ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत नस्तीचा प्रवास होताना त्याच्या प्रत्येक टप्प्याची ऑनलाइन नोंद होईल. त्यामुळे नस्ती नेमकी कुठे आहे याचाही शोध लागेल, याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी लक्ष वेधले.

प्राधिकरणात झोपु योजनेसाठी प्रस्ताव सादर करताना सर्व कागदपत्रे ऑनलाइनच सादर करावी लागणार आहेत. इतकेच नव्हे तर विविध झोपु योजनांबाबतचे तक्रारअर्जही ऑनलाइन नोंदले जाणार आहेत. इरादा पत्र (एलओआय), बांधकाम सुरू करण्याआधीची पूर्तता (आयओए), बांधकाम सुरू करण्याचे प्रमाणपत्र (सीसी) हेही ऑनलाइनच जारी केले जाणार आहेत. झोपुवासीयांना सोडत पद्धतीने घरांचे वाटपही यापुढे संगणकीय प्रक्रियेद्वारेच होणार असल्याचे प्राधिकरणाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे हर्षद कऱ्हाडे यांनी सांगितले.

झोपु प्राधिकरणात येणारे प्रत्येक अर्ज तसेच प्रस्ताव हे यापुढे ऑनलाइन सादर होतील. प्रत्येक बाबीची त्यामुळे नोंद राहील. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर वरिष्ठांचे नियंत्रण राहील. त्यामुळे यापुढे प्राधिकरणात भ्रष्टाचाराला वाव असणार नाही, पारदर्शकता वाढेल तसेच शासनाच्या धोरणानुसार व्यवसाय सुलभीकरणही होईल.

– दीपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपु प्राधिकरण