प्रकल्पपूर्तीच्या उद्दिष्टास विलंब होण्याची शक्यता

सुहास जोशी, लोकसत्ता

मुंबई : शहर आणि महानगर परिसरात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर अद्यापही मजुरांची कमतरताच असून अपेक्षित क्षमतेपेक्षा केवळ ५० टक्केच मजूर सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे नजीकच्या काळातील प्रकल्पपूर्तीच्या उद्दिष्टास विलंब होऊ शकतो.

शहर आणि महानगर परिसरात सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (एमएमआरसी) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) मेट्रो, उड्डाणपूल, सागरी सेतू अशी विविध पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधांची कामे ठप्प झाली तरी सर्व यंत्रणांनी या काळात मजुरांचे वेतन, निवास-भोजन सुविधा सुरू ठेवली होती. मात्र टाळेबंदीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात हजारो मजुरांनी शहरातून मूळ गावी स्थलांतर केले. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस केवळ २० टक्केच मजूर कार्यरत होते.

जूनच्या अखेरीस आणि जुलै महिन्यात काही मजुरांनी पुन्हा मुंबईची वाट पकडली, तर काही यंत्रणांनी नवीन भरती सुरू केली. मात्र जुलैअखेरीस सर्वच ठिकाणी मजुरांची संख्या केवळ ३५ टक्क्यांच्या आसपास होती. ऑगस्टमध्ये यात काहीशी वाढ होऊन ही संख्या जेमतेम ५० टक्के पर्यंत पोहोचली. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात पायाभूत सुविधांवर मजुरांची संख्या कमी होते. या वर्षी करोनामुळे त्यात भर पडल्याचे अनेक अधिकाऱ्यांनी सांगितले. मजूर पूर्ण क्षमतेने उपलब्ध नसल्याने अनेक प्रकल्पांच्या पूर्ततेचे सुधारित उद्दिष्ट काय असेल त्याबाबत निश्चिती होऊ शकत नाही, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

‘एमएमआरसी’तर्फे कुलाबा ते सीप्झ या ३३.५ किमीच्या संपूर्ण भुयारी मेट्रो ३चे काम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करोनापूर्व काळात सुमारे १५ हजार मजूर काम करत होते. मे महिनाअखेर ही संख्या चार हजार झाली, जून-जुलैमध्ये पाच हजार ६०० वर पोहचली तर ऑगस्टअखेर आठ हजार १०० आहे. सध्या या प्रकल्पाच्या आरेमधील कारशेडचा प्रश्नदेखील १० महिन्यांपासून प्रलंबित असल्याने कारशेडचे काम ठप्प आहे.

एमएमआरडीएमार्फत सहा मेट्रो मार्गिका प्रकल्प, शिवडी ते चिर्ले (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड), छेडा नगर येथील उड्डाणपूल विस्तार, कलानगर ते वांद्रे वर्सोवा सी लिंक विस्तार उड्डाणपूल अशी कामे सुरू आहेत. मे महिनाअखेर मजुरांची संख्या १६ हजारांवरून तीन हजारांवर घसरली. जूनमध्ये महिन्यात प्राधिकरणाने केवळ राज्यातील मजुरांसाठी (१६ हजार) थेट कंत्राटदाराकडे भरतीसाठी जाहिरात दिली. त्यानुसार जून महिन्यात केवळ ४६४ मजूरच भरती झाले. ऑगस्टअखेर सर्व प्रकल्पांवर मिळून सुमारे ५ हजार मजूर कार्यरत आहेत.  एमएसआरडीसीतर्फे नुकतेच वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे काम सुरू झाले. टाळेबंदीच्या काळात काम बरेच रखडले असून अपेक्षित मजुरांची संख्या दीड ते दोन हजारच्या घरात आहे. जुलैअखेर या ठिकाणी १४५ मजूर कार्यरत होते. ऑगस्टअखेरही त्यात वाढ झाली नाही.

मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ मार्गिका मे २०२१ पर्यंत सुरू

सध्या कामगारांची कमतरता असली तरी मेट्रो २ ए (डीएन नगर ते दहिसर) आणि मेट्रो ७ (अंधेरी ते दहिसर) या दोन्ही मार्गिका मे २०२१पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. ही कामे शेवटच्या टप्प्यात असून त्यासाठी मजूर कमी न पडू देण्याचा प्रयत्न राहील, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.