News Flash

उघडय़ा भुयारी गटारद्वारांबाबत खुलासा करा!

डॉ. अमरापूरकर यांच्यासारख्या हुशार आणि निष्णांत डॉक्टरचा असा दुर्दैवी मृत्यू होणे हे दु:खद आहे.

mumbai high court, loksatta
मुंबई उच्च न्यायालय. (संग्रहित छायाचित्र)

न्यायालयाचे पालिका-सरकारला आदेश; अमरापूरकर यांच्या कुटुंबीयांस स्वतंत्र याचिका करण्यास मुभा

मंगळवारच्या मुंबईला एकदा ठप्प करणाऱ्या मंगळवारच्या पावसात एलफिन्स्टन येथे उघडय़ा भुयारी गटारद्वारामध्ये (मॅनहोल) पडून बॉम्बे रुग्णालयाचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि दु:खद आहे. मात्र त्यामुळे त्यांच्या मृत्यूसाठी पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करणे ही काही जनहित याचिका होऊ शकत नाही. त्यांचे कुटुंबीय या मागणीसाठी स्वतंत्रपणे याचिका करू शकते, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. परंतु त्याचवेळी न्यायालयाने याचिकेत उपस्थित खड्डे आणि उघडय़ा भुयारी गटारद्वाराच्या मुद्दय़ावर मात्र पालिका तसेच राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

डॉ. अमरापूरकर यांच्यासारख्या हुशार आणि निष्णांत डॉक्टरचा असा दुर्दैवी मृत्यू होणे हे दु:खद आहे. परंतु न्यायालय भावनिक होऊ शकत नाही. जनहित याचिकेसाठी काही मर्यादा असतात, असे मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या वेळी स्पष्ट केले. मात्र याचिकेत उपस्थित खड्डे आणि उघडय़ा भुयारी गटारद्वाराच्या मुद्दय़ांवर सविस्तर सुनावणी घेतली जाऊ शकते. हे मुद्दे जनहितार्थ आहेत. त्यामुळे ही याचिका या मुद्दय़ांपुरती मर्यादित ऐकली जाईल, असे नमूद करत न्यायालयाने पालिका आणि राज्य सरकारला त्यावर खुलासा करण्याचे आदेश दिले. डॉ. अमरापूरकर हे गरीब होते वा त्यांचे कुटुंबीय अशिक्षित होते असे नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची आणि नुकसानभरपाईची मागणी करण्यासाठी स्वतंत्र याचिका करू शकतात, असेही न्यायालयाने याचिकेतील त्यांचे मुद्दे फेटाळून लावताना स्पष्ट केले.

‘फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन’ने ही याचिका केली आहे. उघडय़ा भुयारी गटारद्वाराभोवताली बॅरिकेड्स लावणे वा नागरिकांना त्याच्या धोक्याचा इशारा देणारा फलक लावणे ही पालिकेची जबाबदारी आहे. मात्र पालिकेने यापैकी काही न केल्याने डॉ. अमरापूरकर यांचा त्यात पडून मृत्यू झाला. त्यामुळेच पालिकेला त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरून पालिकेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी धोरण आखण्यास मदत होईल यासाठी आणि मुंबईतील सगळ्या भुयारी गटारद्वाराची पाहणी करण्यासाठी एक सल्लागार समिती स्थापन करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.

घटनेची चौकशी करण्याचे आयुक्तांचे आदेश

पर्जन्य जलवाहिनीच्या गटारद्वारमध्ये पडून बॉम्बे रुग्णालयातील पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे या घटनेची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. या घटनेची चौकशी करण्याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांच्यावर  सोपविण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांमध्ये त्यांना या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करावा लागणार आहे.या दुर्घटनेची तपशीलवार माहिती घ्यावी, घटनेची कारणमीमांसा, अशा घटना घडू नये म्हणून कोणत्या उपाययोजना कराव्या यादृष्टीने चौकशी करण्यात यावी, अशी सूचना विजय सिंघल यांना करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 4:23 am

Web Title: open manhole issue high court bmc
Next Stories
1 विसर्जनाच्यावेळी आवाज नियमांचे उल्लंघन
2 महाविद्यालयांत वाहन परवान्याची योजना कागदावरच
3 शृंखला कदम आणि सुनील जमाल ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते
Just Now!
X