मंत्रालयात आत्महत्या रोखण्यासाठी संरक्षक जाळी लावण्यावरून विरोधकांचा हल्लाबोल

मंत्रालयात आत्महत्येचे वाढते प्रयत्न रोखण्यासाठी जाळी लावण्याच्या सरकारच्या ‘उद्योगावर’ विरोधी पक्षांनी घणाघाती टीका केली आहे. बेरोजगारीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी कठोर पावले उचलण्याऐवजी हे सरकार नैराश्यग्रस्तांना ‘जाळ्या’त पकडण्याची थट्टा करीत आहे, अशी टीका विरोधी नेत्यांनी केली आहे. नीटनेटके काम करून लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी मंत्रालयात ‘नेट’ लावून हे सरकारच आता जनक्षोभाच्या जाळ्यात सापडत चालल्याची जळजळीत टीका काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक, शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते अनिल परब व मनसेचे बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

‘‘गावपातळीपासून थेट मंत्रालयापर्यंत भाजपच्या ठेकेदारांनी पैशाची जाळी लावून लोकांची कामे करण्यात अडथळे निर्माण केल्यामुळेच नाडलेल्या शेतकऱ्यांना, बेरोजगारांना तसेच कष्टकऱ्यांना मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याची वेळ आली’’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी केला.

‘‘मंत्रालयात ८० वर्षांच्या धर्मा पाटील या शेतकऱ्यासह गेल्या काही महिन्यांमध्ये काहींनी आत्महत्या केल्या किंवा आत्महत्येचे प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षां’ या निवासस्थाबाहेरही आत्महत्येचे ‘प्रयोग’ सुरु झाले असून, सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर होत नाहीच; परंतु मंत्रालयातही त्यांना केवळ ठेंगाच दाखविण्यात येत असल्याने आपल्याला कोणीच वाली नसल्याच्या भावनेतून या आत्महत्या होत आहेत’’, असे काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. भाजपचे सरकार हे लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी मंत्रालयात जाळी लावण्याचा पोरकटपणा करत असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

‘‘नेटका कारभार करून लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी मंत्रालयात ‘नेट’ लावण्याचा हास्यास्पद उद्योग सरकारने केला आहे’’, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. ‘‘भाजपच्या गेल्या तीन वर्षांच्या काळात राज्यभर सुमारे दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही आतापर्यंत हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळू शकलेली नाही. ‘संपूर्ण कर्जमाफी ते सरसकट कर्जमाफी’ असे शब्दांचे अनेक खेळ मुख्यमंत्र्यांनी केले’’, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. विषप्राशन करणाऱ्यांसाठी तसेच आत्मदहन करणाऱ्यांना रोखण्यासाठीही आगामी काळात सरकारच्या सुपिक डोक्यातून काहीतरी कल्पना बाहेर पडल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

उद्या वर्षां निवासस्थानाबाहेर आत्महत्येचे प्रयत्न होऊ लागले तर ‘वर्षां’बाहेरचे रस्ते लोकांसाठी बंद करणार का, असा सवाल करत शिवसेनेचे आमदार व विधान परिषदेतील गटनेते अनिल परब यांनी आत्महत्या रोखण्यासाठी राज्यभर जाळी घेऊन बसायला लागेल, असा मार्मिक टोला सरकारला लगावला.

काँग्रेस सरकारच्या काळापेक्षा भाजपच्या गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार वाढला आहे. मंत्रालय हा दलालांचा अड्डा बनला असून, भाजपच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही त्यांना वाचविण्याचेच काम मुख्यमंत्री करत आहेत. अशावेळी सर्वसामान्य जनतेची कामे कशी होणार, असा सवाल मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला.

आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना न करता केवळ जाळी लावणे हा पीडितांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रयत्न आहे, असेही नांदगावकर म्हणाले.

स्थानिक पातळीवर सर्वसामान्यांची कामेच होत नसून, मंत्रालयातही त्यांना ठेंगा दाखविण्यात येतो. पीडितांचे प्रश्न सोडविण्याऐवजी आत्महत्या रोखण्यासाठी जाळी लावणे पोरकटपणाचे आहे.

पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री