लोकसत्ता प्रतिनिधी

ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने केईएम रुग्णालयात सुरू झालेल्या कोविडशील्ड लशीच्या वैद्यकीय चाचण्यांपाठोपाठ नायर रुग्णालयातही सोमवारपासून चाचण्या सुरू झाल्या आहेत. महिनाभरात दोन्ही रुग्णालयातील वैद्यकीय चाचण्या पूर्ण होणार आहेत.

ऑक्सफर्डच्या करोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांसाठी मुंबईतील केईएम आणि नायर या दोन रुग्णालयांना परवानगी दिली होती. केईएम रुग्णालयात २६ सप्टेंबरपासून या चाचण्या सुरू झाल्या असून सोमवारपर्यंत ११ जणांना लस देण्यात आली आहे. नायरमध्ये ही सोमवारपासून चाचण्यांना सुरूवात झाली असून दोन दिवसांत आठ जणांना लस दिलेली आहे. प्रत्येकी १०० अशा दोन्ही रुग्णालयात २०० स्वयंसेवकांवर चाचण्या केल्या जात असून महिनाभरात चाचण्या पूर्ण होतील.

१८ वर्षे पूर्ण, करोनाची बाधा झालेली नसावी आणि इतर कोणतेही आजार नसावेत असे निकष चाचण्या देण्यासाठी ठरविले आहेत. लस दिल्यानंतर काही तास स्वयंसेवकांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले जाते. त्यानंतर घरी सोडले जाते. घरी गेल्यावर त्यांना कोणते दुष्परिणाम आढळ्यास तातडीने संपर्क करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच डॉक्टरांकडूनही यांचा पाठपुरावा केला जातो. असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

दर दिवशी तीन ते पाच जणांना लस दिली जाते. लस देण्याच्या आदल्या दिवशी आरटीपीसीआर, प्रतिजन इत्यादी चाचण्यांच्या माध्यमातून त्या व्यक्तीला करोनाची बाधा या आधी झालेली नाही याची खात्री केली जाते. संर्पूण चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या व्यक्तीला लस देण्यासाठी दुसऱ्या दिवशी बोलाविले जाते. लशीच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच याचे परिणाम जाहीर केले जातील. तोपर्यत लस कोणाला दिली, काही दुष्परिणाम जाणवले का या सर्व बाबींबाबत चाचण्यांच्या करारानुसार गुप्तता पाळण्यात येईल, असेही केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केले.