वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत अपुरी वाहतुकीची साधने ही मुंबई महानगर प्रदेशाची सर्वात मोठी डोकेदुखी आहे. त्यातही मध्य रेल्वेचा मुंबई ते कर्जत/कसारा हा उपनगरी रेल्वे प्रवास अत्यंत जिकरीचा झाला असून महिला प्रवाशांची परिस्थिती भीषण आहे. गेल्या काही वर्षांत नोकरदार महिलांची संख्या ज्या प्रमाणात वाढली, त्याप्रमाणात त्यांना सुविधा मिळाल्या नाहीत. परिणामी एकेकाळी काहीसा सोपा मानला जाणारा ‘महिला’ डब्यातील प्रवास आता यातनामय होऊ लागला आहे. त्याची दखल रेल्वे प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.

ठाण्यापासून पुढे कर्जत ते कसारापर्यंत मोठमोठे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. अतिशय झपाटय़ाने ही गाव-खेडी जवळील शहरात विलीन होत आहेत. कारण सर्वसामान्यांना परवाडणारी घरे आता मुंबई-ठाण्यात नसल्यामुळे कल्याण, अंबरनाथ, शहापूर आणि कर्जत तालुक्यांचे झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. या वाढत्या नागरीकरणाचा भार सर्वच सुखसुविधांवर पडत आहे. रस्ते, वीज, पाणीपुरवठा, वाहनतळ या नागरी सुविधांबरोबर उपनगरी रेल्वे वाहतुकीवरही त्याचा जबरदस्त ताण पडत आहे. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी कसारा भागातून येणारी लोकल खर्डी, कसारा, आसनगाव, टिटवाळा भागातील किरकोळ प्रवासी, भाजी, दूध विक्रेते घेऊन मुंबईच्या दिशेने धावायची. अशीच परिस्थिती नेरळ, अंबरनाथ, बदलापूर या महत्त्वाच्या स्थानकांवरील प्रवासी घेऊन येणाऱ्या कर्जत लोकलची होती. त्याकाळी रेल्वे डब्यात व्यवस्थित उभे राहता येईल. वर्तमानपत्र दोन्ही हातांनी पसरून दोन आसनांच्या मध्ये उभे राहून वाचता येईल, असे सुटसुटीत वातावरण असायचे. प्रथमश्रेणी डबा ठाण्याच्या पुढे प्रवाशांनी भरत असल्याने अनेक प्रवासी विशेषत: महिला प्रवासी डब्यात पेपर खाली टाकून त्यावर बसायच्या. प्रथम श्रेणी डब्यांचे ठाण्यापर्यंतचे तरी हेच चित्र होते.

आता मात्र परिस्थिती पूर्णत: बदललेली आहे. कर्जत, कसारा येथून सीएसएमटीकडे सुटणाऱ्या लोकलमधील महिलांचे डबे टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूपर्यंत गच्च भरलेले असतात. त्यामुळे पुढील सर्व स्थानकांमधील महिला प्रवाशांना मोठा संघर्ष, चढाओढ करून लोकलमध्ये चढावे लागते. अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, आसनगाव येथून येणाऱ्या लोकलमध्ये अशीच परिस्थिती असते. महिलांच्या सामान्य तसेच प्रथमश्रेणी डब्यात चढणे म्हणजे हल्ली वीस ते पंचवीस वर्षांहून अधिक काळ नोकरी केलेल्या, लोकल प्रवास केलेल्या महिलांना मोठे संकट वाटू लागले आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि त्यापुढील रेल्वे स्थानकांवर महिलांच्या डब्यात चढणे अनेक वर्षे प्रवास करणाऱ्या सराईत महिलांनासुद्धा शक्य होत नाही. त्यामुळे नवख्यांची किंवा कधीमधी प्रवास करणाऱ्यांची काय अवस्था होत असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. अनेक वर्षांची नोकरी केवळ अवघड लोकल प्रवासामुळे सोडणे शक्य नाही. त्यामुळे नाइलाज म्हणून अनेक महिला दररोज मुंबई, नवी मुंबईची वाट धरत आहेत. कुटुंबाची घडी नीट बसलेल्या अनेक महिलांनी नोकरीच्या शेवटच्या चार-पाच वर्षांवर पाणी सोडून निवृत्ती पत्करली आहे. प्रशासनातील महिला वर्गाची काम करण्याची पद्धत सरळमार्गी, पारदर्शी असल्याने खासगी, सरकारी व अन्य प्रशासनातील महिलांची सेवा खूप महत्त्वाची असते. अशा महिला केवळ अवघड लोकल प्रवास हा विचार करून प्रशासनातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन बाहेर पडत आहेत हे शासन, प्रशासनाचे एक प्रकारे नुकसान आहे. अलीकडे शासनातील नोकरदार वर्ग मोठय़ा संख्येने निवृत्त, स्वेच्छानिवृत्त होऊन प्रशासनातून बाहेर पडत आहे. या न भरल्या जाणाऱ्या जागा नागरिकांची गैरसोय, शासनाची अडचण आणि प्रशासकीय कामकाजाचा खोळंबा करीत आहेत. या सगळ्या प्रक्रियेत पुरुष नोकरदार वर्गाबरोबर महिला नोकरदार वर्गही तितकाच महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे महिला प्रवासी निवृत्तीपर्यंत प्रशासनात राहिला पाहिजे, यासाठी त्यांची प्रवासातील अडचण दूर करणे हेही शासनाचे काम आहे. रेल्वे प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.

विविध रेल्वे संघटनांनी महिला डब्यांची, विशेष महिला लोकलची संख्या वाढवा म्हणून वेळोवेळी रेल्वे प्रशासनाला पत्रे दिली आहेत. या पत्रांची दखल घेऊन सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी सीएसएमटीवरून सहा ते आठ वेळेत महिलांसाठी विशेष लोकल ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ दिशेने सोडल्या तर सध्या प्रवासात जी  महिलांची घुसमट होतेय ती काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. महिलांवरील अन्याय, अत्याचार, महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन सर्वोतपरी प्रयत्नशील आहे. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनाने महिला प्रवाशांना प्रवास करतानाच्या या अडचणीचा विचार करणे आवश्यक आहे. केवळ डबे वाढवून महिला प्रवाशांना तात्पुरता दिलासा मिळेल, पण तो कायमचा उपाय नाही. पुरुष प्रवाशांवर अन्याय करून आमच्यासाठी लोकल वाढवा, अशीही महिला प्रवाशांची मागणी नाही. तर वेळापत्रकात फेरबदल करून आवश्यकतेनुसार सकाळ, संध्याकाळच्या वेळेत महिलांसाठी लोकल वाढवा, एवढीच महिला प्रवाशांची मागणी आहे. कुटुंब, प्रशासन अशा आघाडय़ांवर कार्यरत महिलांची रेल्वे प्रवासातील होणारी दररोजची घुसमट कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. सर्वच आघाडय़ांवर कार्यरत असलेली नारीशक्ती फार काळ गुदमरलेल्या अवस्थेत ठेवणे महिला उन्नत्तीकरणाचे गोडवे गाणाऱ्या शासनासाठी अशोभनीय आहे.

गर्दीच्या मानाने सुविधा अपुऱ्या

लोकलच्या डब्यातील मोकळे वातावरण पूर्णपणे गायब झाले आहे. अगदी सुरुवातीच्या स्थानकापासून लोकल भरलेली असते. त्यामुळे पुढील प्रत्येक स्थानकातील प्रवाशांना गाडीत शिरण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. गाडीत बसायला जागा मिळेल, असे स्वप्न पाहणेही प्रवाशांनी सोडून दिले आहे. फक्त नीट उभे राहण्यापुरती जागा मिळाली, तरी नशीब अशी परिस्थिती सध्याच्या लोकल प्रवासाची आहे. त्यातही महिला प्रवाशांची अवस्था अतिशय दयनीय आहे. कारण गेल्या काही वर्षांत महिला प्रवाशांची संख्या ज्या पटीने वाढली, त्या तुलनेत त्यांच्यासाठीच्या डब्यांच्या सुविधा रेल्वे प्रशासनाने दिलेल्या नाहीत. सध्या उपनगरी गाडीत महिलांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने आणि मागच्या दिशेने एक महिला डबा आणि मधल्या भागात प्रथम श्रेणीचा डबा असतो. हे डबे आताच्या गर्दीच्या मानाने अपुरे आहेत.