रेल्वेच्या ‘मेगाब्लॉक’मुळे प्रवाशांचे हाल; ठाणे ते कल्याणदरम्यान गर्दीचा पूर

मुंबई/ ठाणे मुसळधार पावसामुळे रडतरखडत गेलेला सोमवार आणि मंगळवारची ‘शासकीय’ सुट्टीनंतर बुधवारी सकाळी कामावर निघालेल्या रेल्वे प्रवाशांना बुधवारी भयंकर संकटाला तोंड द्यावे लागले. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजाबरहुकूम मध्य रेल्वेने बुधवारी चक्क रविवारचे, मेगाब्लॉकच्या दिवसाचे लोकलसेवेचे वेळापत्रक राबवले. या गोष्टीची कल्पना नसल्याने  मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांत गर्दीचा महापूर दिसून आला.त्यातही ठाणे, दिवा, डोंबिवली या स्थानकांतील प्रवाशांना तर नरकयातनाच भोगाव्या लागल्या.

बुधवारी रविवारच्या वेळापत्रकानुसार गाडय़ा चालविल्या जातील याची पुरेशी कल्पना नसलेल्या प्रवाशांचे लोंढे या स्थानकांमध्ये नेहमीप्रमाणे शिरले आणि गाडय़ांची वाट पाहात तासनतास ताटकळत राहिले. त्यामुळे सकाळी आठनंतर या सर्वच स्थानकांमधील गर्दी उत्तरोत्तर वाढत गेली आणि साडेनऊनंतर तर ठाणे, डोंबिवलीसारख्या स्थानकात मुंगी शिरायला देखील जागा शिल्लक राहिली नव्हती. लोकलमध्ये चढताना प्रवाशांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन शिरावे लागत होते. लोकलमध्ये चढण्या-उतरण्यावरून झालेल्या झुंबडीत अनेक महिला, वृद्ध, रुग्ण, अंपग प्रवाशांचे हाल झाले. अखेर उशिराने जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालविण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर दुपारी प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. तोवर अनेक प्रवाशांना भोवळ येणे, चेंगराचेंगरीत जखमी होणे असे प्रकार घडून गेले होते.

ठाणे ते सीएसटी प्रवासादरम्यान ठाण्यातूनच बहुतांश गाडय़ा भरून येत असल्याने विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, शीव या स्थानकांवरील प्रवाशांना गाडय़ांमध्ये प्रवेश करणेही दुरापास्त झाले होते. आधीच्याच गाडय़ांमध्ये दारात धोकादायक पद्धतीने लटकून येणारे प्रवासी पाहिल्यावर अनेकांना पुढची गाडी कधी येते याची वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हते. डोंबिवली-दिवा स्थानकातील अनेक प्रवाशांनी डाऊन गाडय़ांनी कल्याण गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र डाऊनच्या गाडय़ाही दिव्यावरूनच भरून येत असल्याने डोंबिवली-कल्याण स्थानकांतील प्रवाशांना गाडय़ांमध्ये चढताच येत नव्हते, अशी तक्रार प्रवाशांनी केली.

काही प्रवाशांनी द्वितीय श्रेणीच्या डब्यात चढता येत नसल्याने प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास केला. मात्र या डब्यांमध्ये कसे तरी उभे राहता येईल अशीच अवस्था होती. याबाबत अनुभव सांगताना सोनेश्वर पाटील हा तरुण म्हणाला की, लोअर परळला कामावर जाण्यासाठी विक्रोळी रेल्वे स्थानकात आलो. मात्र तेथे लोकलची वाट बघत थांबलेल्यांची मोठी गर्दी उभी होती. त्यातील काही प्रवाशांनी आधीच्या गाडय़ांना गर्दी असल्याने त्या सोडल्या होत्या. सुमारे १५ मिनिटांनी एक लोकल गाडी स्थानकावर आली. त्या गाडीलाही प्रचंड गर्दी होती. द्वितीय श्रेणीच्या डब्यात प्रवासी आधीच दरवाज्यात लटकत उभे असल्याने तेथे प्रवेश मिळणे महाकठीण होते. प्रथम श्रेणीच्या डब्याकडे गेलो तर त्या ठिकाणीही प्रचंड गर्दी होती. मात्र डब्यात कसेबसे शिरता आले. तेथेही चेंगराचेंगरी होते की काय, अशीच स्थिती होती.

ठाण्याच्या पुढेही हीच गर्दी कायम होती. शीव स्थानकात दुपारी बारा ते सव्वाएकच्या दरम्यान दादरकडे जाणाऱ्या तब्बल पाच ते सहा गाडय़ा आल्या. परंतु प्रवाशांना एकाही गाडीत सहज चढणे शक्य नव्हते. त्यातल्या बऱ्याच गाडय़ांच्या दाराशी आधीपासूनच प्रवाशी लटकलेले होते. अशा एकामागून एक पाच ते सहा गाडय़ा सोडाव्या लागत होत्या. बारा ते सव्वाएक दरम्यान आलेल्या गाडय़ांपैकी काही शीव स्थानकातच ठरावीक अंतरावर जाऊ न थांबत होत्या, तर काही शीव-माटुंगा स्थानकाच्या दरम्यान थांबत होत्या. विशेष म्हणजे प्रत्येक गाडीत चढणाऱ्यांची आणि उतरणाऱ्यांची बाचाबाची होत होती. काही मंडळी तर अगदी प्रवाशांची गचांडी धरत होते. एकंदर अशा हिंसक गर्दीला घाबरून अनेक जण स्थानकातच ताटकळत उभे होते. काही लोक या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत होते. दोन दिवसांच्या गैरसोयीनंतरही धिम्या गतीने सुरू असलेल्या रेल्वे वाहतुकीबद्दल लोकलच्या गर्दीत अडकलेला प्रत्येक प्रवासी भरभरून तोंडसुख घेत होता. दुपारी एक-दीडपर्यंत हा प्रकार सुरू असल्याने अनेकांनी वाट पाहून आजही सुट्टी घेत घरचा मार्ग पत्करला.

‘मेगाब्लॉक’मध्ये करतात काय?

तुम्ही रविवारी सकाळी कुटुंबासमवेत फिरायला जाण्याचा विचार करता. रेल्वे स्थानकात पोहचता. तोच स्थानकात उद्घोषणा होते. ‘प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे.. आज अमुक-अमुक स्थानकात तांत्रिक कारणामुळे मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.’ ही उद्घोषणा कानावर पडताच रविवारच्या बेताचा हिरमोड होतो. बरे, दर आठवडय़ाला मेगाब्लॉक घेऊनही लोकलसेवा आठवडय़ातून एकदा तरी कोलमडतेच. अशा वेळी ‘मेगाब्लॉक’ घेऊन करतात तरी काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. ‘मेगाब्लॉक’मध्ये नेमके कसे काम चालते, हेच उलगडून सांगण्याचा हा प्रयत्न.

आधीचे नियोजन

मेगाब्लॉक घेताना सुरुवातीला कोणत्या विभागात मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्याची माहिती घेतली जाते. उदाहरणार्थ मांटुगा ते मुलुंड या स्थानकापर्यंत अप मार्गावर मेगाब्लॉक घ्यायचा आहे, तर त्याचे नियोजन काही दिवस आधीच केले जाते. त्यानंतर म्हणजे रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल या विभागातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली जाते. मेगाब्लॉक किती वेळेत घ्यावा याचे नियोजन करण्यात येते. त्यानंतर या मेगाब्लॉकचे वृत्त प्रसिद्ध केले जाते.

सिग्नल आणि ओव्हरहेड वायर

सध्या स्वयंचलित सिग्नल यंत्रणा असल्याने फक्त पावसाचे पाणी किंवा इतर छोटय़ा-मोठय़ा म्हणजेच कॉईल खराब झाल्यास बदलणे, सिग्नलचे दिवे तपासले जातात. तर ओव्हरहेड वायरची तार, तिची जोडणी याची तपासणी केली जाते. हे काम लवकर पूर्ण होते. मात्र, रुळांची देखभाल हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो.

 रेल्वे रुळांची दुरुस्ती

रुळांची देखभाल करण्यासाठी सर्वात जास्त वेळ जातो. रुळांवरील लहानसहान त्रुटीही जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे रेल्वे रुळांची कामे करणारे कर्मचारी रुळांमधील अंतर तपासले जाते. यासह एखाद्या रुळाचे पीन (रुळांना जोडून ठेवणारे) बाहेर पडले असल्यास ते बसविले जातात. रुळांवरील स्लीपर (रुळांमध्ये असलेले सीमेंटचे आडवे खांब) बदली करणे, रुळांची जोडणी (वेिल्डग) करणे किंवा एखाद्या अखंड रेल्वे रुळावरील काही रूळ निकृष्ट झाल्यास तो भागच बदलणे इत्यादी कामे केली जातात. त्यामुळे आठवडय़ाला लोकल आणि एक्स्प्रेस सेवा उशिरा पण सुरक्षित सुरू असतात.