News Flash

वाहन क्रमांकांशी छेडछाड करणाऱ्या ‘दादां’वर कारवाई

वाहन क्रमांक पट्टीवर मराठीत क्रमांक लिहिणाऱ्या ७,५४१ वाहनांवर २०१८मध्ये कारवाई करण्यात आली होती.

 

राज्यभरात ७३ हजार वाहनचालकांना दंड; मुंबईत सर्वाधिक ३२ हजार चालक दोषी

वाहन क्रमांकांशी ‘कल्पक’ छेडछाड करत त्यातून ‘दादा-भाई-नाना-मामा-आई’ असे शब्द साकारणाऱ्या वाहनचालकांना ही कल्पकता महागात पडत आहे. चालू वर्षांत महामार्ग पोलिसांनी राज्यभरातील ७३ हजार वाहनचालकांवर अशा छेडछाडीबद्दल कारवाई केली आहे. गेल्या वर्षी (२०१८) राज्यात अशा ९४ हजार ५२५ चालकांवर कारवाई झाली होती. दर वर्षी इतक्या मोठय़ा प्रमाणावर कारवाई होऊनही वाहन क्रमांकाशी छेडछाड करण्याचे प्रकार कमी झालेले नाही. वाहन क्रमांक पट्टीबाबतचे नियम धुडकावणाऱ्यांमध्ये मुंबई आघाडीवर आहे.

वाहन पट्टीवर अयोग्य पद्धतीने वाहन क्रमांक नमूद करणे आणि मराठीत वाहन क्रमांक लिहिणे या करिता २०१८ पर्यंत वेगवेगळ्या कलमांखाली कारवाई केली जात होती. मात्र २०१९ पासून या दोन्ही प्रकारासाठी एकाच कलमाखाली कारवाई होऊ लागली. यानुसार २०१९मध्ये झालेल्या कारवाईत राज्यभरात ७३ हजार ३८ चालकांना अयोग्य पद्धतीने वाहन क्रमांक नमूद केल्याबद्दल दंड करण्यात आला. त्यातून ९७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुंबईत अशी तब्बल ३२ हजार १३० प्रकरणे आढळून आली आहेत. तर ठाण्यात १ हजार २०४ चालकांवर कारवाई करण्यात आली.

वाहन क्रमांक पट्टी विशिष्ट प्रकारचीच असावी असा नियम आहे. परंतु, अनेक वाहनचालक वाहन क्रमांकाची तोडमोड करून वा त्यात कल्पक बदल करून तशा पट्टय़ा वाहनांवर लावतात. उदाहरणार्थ एखाद्या वाहनाचा क्रमांक ४१४१ असल्यास त्याची ‘दादा’ असे शब्द दिसण्यासाठी रचना करणे किंवा ४१३७ क्रमांक असल्यास ‘भाऊ’ किंवा ७१७१ असल्यासा केवळ ‘नाना’ असा उल्लेख करणे इत्यादी. याशिवाय वाहन क्रमांक पट्टीची मांडणी व्यवस्थित नसलेल्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, एखादा वाहतूक नियम मोडल्यास चालत्या वाहनाचा क्रमांक सहज टिपता येणार नाही, या दृष्टीनेही त्यात बदल केले जातात.

वाहन क्रमांक पट्टीवर मराठीत क्रमांक लिहिणाऱ्या ७,५४१ वाहनांवर २०१८मध्ये कारवाई करण्यात आली होती. या वाहनचालकांकडून वाहतूक महामार्ग पोलिसांनी १५ लाख रुपयांचा दंड वसूल केला.  यात सर्वाधिक मुंबईतील २ हजार ७७२ वाहनांचा समावेश होता. त्या खालोखाल नाशिकमध्ये २ हजार ५३९ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

९४५२५ 

२०१८मध्ये चालकांवर कारवाई १.७७ कोटी

एकूण दंडवसुली –  सर्वाधिक कारवाई झालेली शहरे : मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 12:21 am

Web Title: penalties penalty punishable by convicted driver number palte akp 94
Next Stories
1 ४० हजार टॅब नादुरुस्त
2 पश्चिम रेल्वेच्या पंधरा स्थानकोंवर सौरचार्जर
3 शनिवार, रविवार तिन्ही मार्गावर ब्लॉक
Just Now!
X