‘पाहुण्यां’ना परत पाठवण्याच्या याचिकेवर न्यायालयाचे मत

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयामध्ये आणलेल्या पेंग्विनची आवश्यक काळजी घेतली जात नाही, असा निष्कर्ष काढून मुंबईकरांना पेंग्विन ‘दर्शना’च्या आनंदापासून वंचित ठेवू शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. देखभालीच्या मुद्दय़ावर पेंग्विनना परत मायदेशी, दक्षिण कोरियात पाठवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना ‘पेंग्विन दर्शन सुरू करण्यापासून आम्ही पालिकेला थांबवू शकत नाही’ असे न्यायालयाने स्पष्ट केले.

जुलै महिन्यात दक्षिण कोरियाहून आठ पेंग्विन वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणण्यात आले होते, परंतु या परदेशी पाहुण्यांना येथे आणल्यानंतर तीन महिन्यांतच त्यातील एकाचा मृत्यू झाला. आपल्याकडील वातावरण या परदेशी पाहुण्यांना पोषक नाही. तसेच त्यांची आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्यानेच एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे उर्वरित पेंग्विनना वाचवण्याच्या दृष्टीने त्यांना दक्षिण कोरियाला परत पाठवण्याची मागणी अ‍ॅड्. अद्वैत सेठना यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. याशिवाय याचिका प्रलंबित असेपर्यंत सर्वसामान्यांसाठी त्यांच्या केल्या जाणाऱ्या प्रदर्शनालाही मज्जाव करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. खंडपीठाने याचिकाकर्त्यांला ‘या परदेशी पाहुण्यांची आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचा निष्कर्ष काढून मुंबईकरांना त्यांच्या ‘दर्शना’च्या आनंदापासून वंचित का ठेवावे,’ असा सवाल केला. अन्य देशांमध्ये पेंग्विन प्रदर्शन केले जात नाही का, अशी विचारणाही न्यायालयाने केली. तसे करण्यापासून आम्ही पालिकेला थांबवू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट करत प्रकरणाची सुनावणी दोन आठवडे तहकूब केली.

दरम्यान, मागील सुनावणीच्या वेळी या पेंग्विनची आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे. त्यांचे आरोग्य उत्तम आहे. त्यामुळे त्यांना परत पाठवण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे पालिकेने न्यायालयाला सांगितले होते. तर पेंग्विन दर्शनाची तारीख अद्याप निश्चित केलेली नसल्याचे सांगताना ७ मार्च रोजी या परदेशी पाहुण्यांना त्यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या विशेष ठिकाणी हलवण्यात येणार आहे, अशी माहिती  शुक्रवारी न्यायालयाला देण्यात आली.