” दिल्लीवालोसे डर लगता है, न जाने कब नया कानून लेकर चले आते हैं ” असं आपल्या खास शैलीत आणि खर्जातल्या आवाजात म्हणत कवी आणि गीतकार गुलजार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. या दोघांचं नाव त्यांनी घेतलं नाही मात्र त्यांच्या शब्दांचा रोख या दोघांकडेच होता हे उघड आहे. एका वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुलजार यांनी हे वक्तव्य केलं आहे. सध्या CAA, NRC, NPR या वरुन देशभरात बराच गोंधळ सुरु आहे. यावर ज्येष्ठ कवी गुलजार यांनी खास त्यांच्या शैलीत भाष्य केलं.

साधारण सात ते आठ राज्यांनी हा कायदा लागू करणार नाही असंही म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनीही पश्चिम बंगालमध्ये हा कायदा लागू करण्याला विरोध दर्शवला आहे. काँग्रेस तर या कायद्याला विरोध दर्शवतेच आहे. त्यासाठी रस्त्यावर निदर्शनंही सुरु आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत गुलजार हे त्यांच्या खास शैलीत व्यक्त झाले.

मित्रों कहते कहते रुक गया!

याच कार्यक्रमात गुलजार जेव्हा बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी दोस्तों असं म्हटलं आणि त्यानंतर पुढचं वाक्य होतं की मित्रों कहते कहते रुक गया! गुलजार यांनी असं म्हणताच एकच हशा पिकला. तसंच उपस्थितांनी टाळ्याही वाजवल्या.

या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचीही उपस्थिती होती. भालचंद्र नेमाडे यांनीही त्यांचे विचार मांडले. मुंबईत बोलली जाणारी बंबईय्या हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा झाली पाहिजे असा टोला नेमाडे यांनी लगावला. बंबईय्या हिंदीमध्ये चुका होण्याचा संभव फारच कमी आहे असंही नेमाडे यांनी म्हटलं.