05 April 2020

News Flash

एक खड्डा १५ हजारांचा!

पालिकेच्या मुख्यालयासमोरच पडलेले खड्डे असल्याने त्यांना महत्त्व प्राप्त झाले होते.

मिडास टच आणि स्मार्टफील या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दादर आणि फोर्ट भागातील काही खड्डे गुरुवारी बुजविण्यात आले. 

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी दोन वेगवेगळय़ा तंत्रांचा अवलंब

गोल गोल खड्डय़ांनी महापालिकेला जेरीस आणले असून कितीही वेळा भरले तरी पुन्हा मूळ रूपात प्रकटणाऱ्या खड्डय़ांवर जालीम उपाय म्हणून रस्ते विभागाने नव्या तंत्राचा वापर सुरू केला आहे. फोर्ट येथील पालिका मुख्यालयासमोरील दोन खड्डे नव्या मिश्रणाने बुजवण्याचा प्रयोग शुक्रवारी दुपारी पावसात पार पडला. मिडास टच आणि स्मार्टफिल मिश्रणाने भरलेले खड्डे दोन वर्ष टिकण्याची हमी असली तरी त्याचा खर्च हाच कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. दोन खड्डे बुजवण्यासाठी तब्बल ३० हजार रुपयांचे मिश्रण कामी आले आहे. त्यामुळे सरासरी विचार करता मुंबईकरांना एक खड्डा १५ हजार रुपयांना पडणार आहे.

पालिकेच्या मुख्यालयासमोरच पडलेले खड्डे असल्याने त्यांना महत्त्व प्राप्त झाले होते. हे खड्डे गाजत असल्याने गुरुवारी रात्री वॉर्ड कार्यालयाने त्यात पारंपरिक खडी टाकून ते तातडीने बुजवले होते. मात्र शुक्रवारी दुपारीच या खड्डय़ातून खडी बाहेर पडत होती. त्यामुळे पुन्हा खड्डय़ांनी प्रकट होण्याआधी पालिकेने त्यावर मिडास टच देण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दुपारी या खड्डय़ातील आदल्या रात्री भरलेली खडी काढून टाकण्यात आली. त्यातच पावसाची मोठी सर आल्याने खड्डा पाण्याने भरला. मात्रा पाण्याने भरलेल्या दोन्ही खड्डय़ात मिश्रणाच्या बारा पिशव्या रित्या करण्यात आल्या व थापीने हलके दाबून तीन मिनिटात दोन्ही खड्डे बुजवले गेले. त्यानंतर लगेचच त्यावरून गाडय़ाही जाण्यासही परवानगी देण्यात आली. दादरमध्ये गुरुवारी हा प्रयोग करण्यात आला. सेनाभवनजवळच्या रस्त्यावर पडलेला खड्डा बुजवण्यासाठी मिडास टचच्या सहा पिशव्या वापरल्या गेल्या.

यावर्षी खड्डे भरण्यासाठी प्रत्येक वॉर्डच्या गरजेनुसार स्मार्टफिल व मिडास टचचे मिश्रण देण्यात आले आहे. याशिवाय पालिकेच्या वरळी येथील कारखान्यातून पारंपरिक खडीचे मिश्रणही देण्यात आले आहे. ए वॉर्डला प्रत्येकी १४ किलोच्या २१ बॅग मिडास टच  व सुमारे २५ किलोचे सहा गॅलन स्मार्ट फिलचे मिश्रण देण्यात आले. त्यातील मिडास टचच्या प्रत्येकी १४ किलो वजनाच्या १२ पिशव्या पालिकेच्या समोरील दोन खड्डे भरण्यासाठी शुक्रवारी वापरल्याचे ए वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. भर पावसातही वापरता येतील, या प्रकारच्या पाच मिश्रणांची पाहणी गेल्यावर्षी केली. यातील ऑस्ट्रियाच्या तंत्राचे मिडास टच करणारी इकोग्रीन आणि इस्रायलच्या तंत्राचे स्मार्टफिल करणाऱ्या स्मार्टएज या कंपन्यांची निवड करण्यात आली. मात्र प्रशासकीय मंजुरीत पावसाळा निघून गेल्याने गेल्यावर्षी या मिश्रणांचा वापर करता आला नव्हता. त्यामुळे आता वापरत येईल. या दोन कंपन्यांकडून प्रत्येकी १९ लाख टन असे ३८ टन मिश्रण ७० लाख रुपयांना खरेदी केले. मिश्रण टाकल्यावर दुसऱ्या मिनिटाला त्यावरून गाडय़ा जाऊ शकतात, असा दावा करण्यात आला.

समस्या

या मिश्रणासाठी येणारा खर्च हाच या तंत्रज्ञानाच्या वापरातील प्रमुख अडथळा आहे. प्रत्येक खड्डा बुजवण्यासाठी १४ किलो वजनाच्या ६ ते ७ पिशव्या लागत आहेत. एक किलो मिश्रणाला सर्व कर धरून १८५  रुपये प्रति किलो खर्च येत आहे. पालिकेने ३८ टन मिश्रण मागवले असून त्यातून ४५० ते ४७० खड्डे भरण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रत्येक खड्डा सरासरी १५ हजार रुपयांना पडणार आहे. पालिकेकडून  वापरण्यात येणाऱ्या मिश्रणाचा खर्च १० रुपये प्रति किलो आहे.

शहरातील खड्डे बुजवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हे मिश्रण घेण्यात आले आहे. हे मिश्रण वापरताना तारीख, खड्डय़ाची जागा, पाऊस पडत होता का, खड्डे भरताना काय करावे लागले, किती मिश्रण लागले याची नोंद करून ठेवण्यास सांगण्यात आली आहे. त्यामुळे या मिश्रणाचा नेमका कसा फायदा होतो आहे ते  समजू शकेल.

विनोद चिठोरे, प्रमुख अभियंता,रस्ते विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2017 2:25 am

Web Title: potholes issue in mumbai bmc shiv sena
Next Stories
1 विमानतळाच्या शौचालयात ७० लाखांचे सोने
2 अर्धशिक्षित ‘पॅथॉलॉजिस्ट’चा पूर्व उपनगरांत सुळसुळाट
3 पालिकेवर भूखंड परतीची नामुष्की
Just Now!
X