News Flash

नागरिकत्वा’वरून शक्तिप्रदर्शन

भाजपची समर्थनार्थ, तर पुरोगामी संघटनांची विरोधात निदर्शने

भाजपची समर्थनार्थ, तर पुरोगामी संघटनांची विरोधात निदर्शने

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात देशभर असंतोषाचा उद्रेक झाल्यानंतर भाजपने समर्थन मोर्चे सुरू केल्यामुळे या प्रकरणाला शक्तिप्रदर्शनाचे स्वरूप येऊ लागले आहे. भाजपने मुंबईत शुक्रवारी घेतलेली समर्थन सभा आणि पुरोगामी संघटनांनी केलेल्या निदर्शनांतही त्याचा प्रत्यय आला.

मुंबईत शुक्रवारी ‘सीएए’च्या समर्थनार्थ भाजपने ऑगस्ट क्रांती मैदानात सभा घेतली, तर कायद्याच्या विरोधात विद्यार्थी आणि पुरोगामी संघटनांनी निदर्शने केली. दोन्ही बाजूंनी मोर्चे काढण्याची तयारी करण्यात आली होती, पण मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. राष्ट्रीयत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेनेने सत्तेसाठी भूमिका बदलल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला, तर हा कायदा केवळ अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप विरोधात झालेल्या आंदोलनात करण्यात आला.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भाजपच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदान ते चौपाटी मोर्चा काढण्यात येणार होता, तर विद्यार्थी संघटना आणि पुरोगामी संघटनांनी भायखळ्याच्या राणीबागेपासून आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्याची तयारी केली होती. पण कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दय़ावर पोलिसांनी दोन्ही मोर्चाना परवानगी नाकारली. तरीही समर्थनासाठी भाजपने आणि  विरोधासाठी संघटनांनी शक्तिप्रदर्शन केले.

भाजपने ऑगस्ट क्रांती मैदानात सभा घेऊन काँग्रेस आणि शिवसेनेला लक्ष्य केले. आझाद मैदानात झालेल्या विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात भाजपवर हल्लाबोल करण्यात आला. काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय एकता मंचच्या वतीने वांद्रे येथे निदर्शने करण्यात आली. त्यांत शेकडो निदर्शक सहभागी झाले. केवळ मुस्लीम समाजाला लक्ष्य करण्यासाठी हा कायदा करण्यात आल्याचा आरोप खासदार दलवाई यांनी केला. माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनीही भाजप सरकारवर टीका केली.

भाजपच्या सभेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका आणि आरोप करण्यात आले. केवळ सरकार वाचविण्यासाठीच शिवसेनेने आपल्या तत्त्वाला मुरड घालत हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाशी तडजोड केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. सत्तेसाठीच शिवसेनेने तोंडाला कुलूप लावल्याची टीका त्यांनी केली.

कायद्याच्या विरोधात झालेल्या पुरोगामी संघटनांच्या मेळाव्यात भाजपवर हल्ला चढवण्यात आला. हा कायदा फक्त मुस्लिमांनाच नव्हे, तर भटक्या आणि विमुक्तांनाही उद्ध्वस्त करणारा असल्याचा आरोप ‘जेएनयू’चा माजी विद्यार्थी नेता उमर खलिद याने केला.

सुधारित नागरिकत्व कायदा फक्त मुस्लिमांनाच नव्हे, तर भटक्या आणि विमुक्तांनाही उद्ध्वस्त करणारा आहे.

      – उमर खलिद, माजी विद्यार्थी    नेता, जेएनयू, दिल्ली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 5:11 am

Web Title: power demonstration over citizenship amendment bill zws 70
Next Stories
1 व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन
2 सत्तेसाठी शिवसेनेचे तोंडाला कुलूप; फडणवीस यांची टीका
3 देशातील मंदीमुळे महिलांचे वाढते शोषण- वृंदा करात
Just Now!
X