प्रश्नपत्रिकेचे बदललेले स्वरूप विद्यार्थ्यांना कळावे म्हणून सराव चाचण्या घेण्याचे मुंबई विद्यापीठाने जाहीर केले असले तरी पुनर्परीक्षा देणाऱ्या (बॅकलॉग) विद्यार्थ्यांची सराव चाचणी परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्रीपर्यंत घेण्यात आली नाही.

मुंबई विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका या परीक्षेतही विद्यार्थ्यांना चुकलेला नाही. विद्यापीठाच्या विभागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी एका खासगी कंपनीकडून प्रणाली घेतली आहे. ही प्रणाली मॅक प्रणालीसाठी समर्पक नसल्याने बहुतेक विद्यार्थी परीक्षा कशी द्यायची या पेचात आहेत. अनेकांना आयत्या वेळी धावपळ करून अँड्रॉईड किंवा विंडोज प्रणाली असलेले फोन, संगणक यांची सोय करावी लागली.

‘प्रणालीच्या तांत्रिक गोष्टींची पडताळणी सायंकाळी घेण्यात आली. आता विद्यार्थ्यांना सराव चाचण्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे,’ असे परीक्षा संचालक विनोद पाटील यांनी गुरुवारी रात्री सांगितले.

झाले काय? :  विद्यापीठाच्या पुनर्परीक्षा (बॅकलॉग) शुक्रवारपासून सुरू होत आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या शंकांना गुरुवारी रात्रीपर्यंत परीक्षा विभागाने उत्तरेच दिली नाहीत. बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. हे बदललेले स्वरूप विद्यार्थ्यांच्या लक्षात यावे, येणाऱ्या तांत्रिक अडचणींची कल्पना यावी यासाठी त्यांना सराव चाचणी देण्यात येणार होती. मात्र, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांच्या सराव चाचण्या घेण्यात आल्या नाहीत.