मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेला म्हणजेच एनआयएला रविवारी बीकेसी परिसरात मिठी नदीच्या पात्रात शोध मोहिमेदरम्यान अनेक गोष्टा साडल्या. नदी पात्रातून एक कॉम्प्यूटर, सीपीयू, दोन नंबर प्लेट्स आणि आणि अन्य साहित्य एनआयएच्या हाती लागलं आहे. त्यामुळे एनआयएच्या हाती आता या प्रकरणाशी निगडीत मोठे धागेदोरे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या शोध मोहिमेला मिळालेल्या यशानंतर भाजपाचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी राज्यात आणि मुंबईत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला टोला लगावला आहे.

‘आज समजले मुंबई महानगरपालिका मिठी नदी साफ का करत नव्हती! यांना यांची केलेली पापं जनतेसमोर येतील की काय ही भीती होती का?’, अशा कॅप्शनसहीत लाड यांनी आपल्या प्रतिक्रियाचा व्हिडीओ स्वत:च्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट केलाय. एक मिनिट १७ सेकेंदाच्या या व्हिडीओमध्ये लाड यांनी मिठी नदीमध्ये टाकलेली पापं समोर आल्याचे सांगत शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. “आम्ही विचार करत होतो की मिठी नदी साफ का नाही करत?, मुंबई महानगरपालिका मिठी नदी साफ करण्यासाठी टाळाटाळ का करते याचं कारण आज जनतेला कळलं. यांनी केलेली पापं मिठी नदी टाकली होती. ही टाकलेली पापं जर समोर आली तर जनतेसमोर बिंग फुटेल याच भितीने मिठी नदी साफ केली जात नव्हती. सचिन वाझेने मनसुख हिरेन प्रकरणात केलेलं जे महाघाणेरडं कृत्य आहे ते जनतेसमोर उघडं झालं आहे. या प्रकरणामध्ये राजकीय वरदहस्त कोणाचा आहे, तो देखील लवकरात लवकर जनतेसमोर येईल,” असं लाड यांनी म्हटलं आहे.

“मला असं वाटतं की माननिय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जी सचिन वाझेची बाजू घेतली. आता तरी त्यांनी आपलं पाप जनतेसमोर आल्याचं मान्य करुन जनतेची आणि विधानसभेची माफी मागावी ही माझी मागणी आहे,” असंही लाड यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

रविवारी (२८ मार्च २०२१ रोजी) दुपारच्या सुमारास एनआयएची टीम सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीपात्रात शोध मोहिमेसाठी पोहचली होती. यानंतर काही जण नदी पात्रात उतरले व मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने लॅपटॉप, सीपीयू, डीव्हीआर मशीन, प्रिंटर आणि दोन नंबर प्लेट्स शोधून काढल्या.